प्रसंगी चाळीसही मतदारसंघात एकेक कोविड केंद्र ः मुख्यमंत्री

0
187

>> तीन इनडोअर स्टेडियममध्ये केंद्र

राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून कोरोना पॉझिटिव्ह सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी गरज भासल्यास ४० मतदारसंघात प्रत्येकी एक कोविड केअर सेंटर सुरू करण्यास सरकार मागे राहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी काल दिली. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी कार्य करणार्‍या आरोग्य कर्मचार्‍यांचा सन्मान करण्याची गरज आहे. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी एकजुटीने कार्य करण्याची गरज आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्‍वभूमीवर बांबोळीतील श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियम, नावेली (सासष्टी) येथील मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियम आणि पेडण्यातील इनडोअर स्टेडियममध्ये कोविड केंद्र सुरू करण्यात येणार असून त्यासाठीची साधनसुविधा उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे अशी माहिती काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अनधिकृतरित्या पत्रकारांशी बोलताना दिली.

कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची आबाळ होऊ नये. यासाठी राज्यात जास्तीत जास्त कोविड केअर केंद्रेंची स्थापना करीत आहोत. एकाही कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णावर केंद्राअभावी बाहेर राहण्याची पाळी येऊ नये यासाठी आम्ही कोविड केंद्रांची संख्या वाढवीत आहोत, असे स्पष्ट करतानाच त्यासाठी साधनसुविधा वाढवण्याचे काम चालू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
अत्यवस्थ स्थितीत कोविड केंद्रात व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलेल्या कोरोना रुग्णाची स्थिती आता सुधारू लागली असल्याची माहितीही यावेळी मुख्यमंत्र्यांनी एका प्रश्‍नावर दिली. हृदविकाराचा झटका आलेल्या या कोरोना रुग्णाला दोन दिवसांपूर्वी इस्पितळात हलवण्यात आले होते.