प्रमोद सावंत यांच्याच नेतृत्त्वाखाली निवडणूक

0
94

>> भाजपाध्यक्ष नड्डा यांच्याकडून स्पष्ट

>> राज्यात नेतृत्व बदलाची शक्यता फेटाळली

गोव्यात २०२२ मध्ये होणारी गोवा विधानसभा निवडणूक भाजप मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याच नेतृत्त्वाखाली लढवणार असल्याचे काल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. मुख्यमंत्री डॉ. सावंत हे राज्यात पक्षाचे चांगले नेतृत्त्व करीत आहेत. तर गोव्यातील ज्येष्ठ नेते असलेले केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक हे केंद्रात चांगले काम करीत असल्याचे सांगून राज्यात नेतृत्त्व बदलाची शक्यता त्यांनी फेटाळून लावली. केंद्रीय मंत्री असलेल्या श्रीपाद नाईक यांनी आपण स्थानिक राजकारणात येण्यास इच्छुक असल्याचे काही दिवसांपूर्वी स्पष्ट केल्याच्या पार्श्‍वभूमीवर काल पत्रकारांनी नड्डा यांना नेतृव बदलाच्या शक्यतेविषयीचा वरील प्रश्‍न विचारला होता.

घराणेशाहीवरील प्रश्‍नाला बगल
येत्या गोवा विधानसभा निवडणुकीत भाजप एका कुटुंबातील दोन-दोन व्यक्तींना उमेदवारी देऊन घराणेशाहीला खतपाणी घालण्याचे काम करणार आहे काय, असा सवाल पत्रकारांनी केला असता एका कुटुंबातील दोन-दोन व्यक्तींना उमेदवारी देणे म्हणजे घराणेशाही ठरत नाही असा युक्तिवाद त्यांनी करत या प्रश्‍नाचे उत्तर देणेही नड्डा यांनी टाळले. एका पूर्ण कुटुंबाने एखाद्या पक्षाची धुरा वाहणे ही घराणेशाही ठरते असे कुणाचेही नाव न घेता नड्डा म्हणाले. कुणाला उमेदवारी द्यायची आणि कुणाला नाही याचा निर्णय पक्षाची निवडणूक समिती घेणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

भाजपकडून गोव्यात चांगले काम
भाजपने राज्यात चांगले काम केलेले असून येथे मोठमोठे पूल व उड्डाण पूल बांधतानाच राज्यात पायाभूत सुविधांचा चांगला विकास केला असल्याचा दावाही नड्डा यांनी यावेळी केला. राज्यात पक्षाची संघटनाही मजबूत आहे. पक्षाचे राज्यातील आमदार व मंत्री हे चांगले काम करीत आहेत. राज्यातील जनतेची कामे करण्याबाबतही पक्षाचे मंत्री, आमदार व अन्य नेते हे तत्परता दाखवत असल्याचे ते म्हणाले.

कॉंग्रेसमधून आलेले नेते आता भाजपमय झाले
कॉंग्रेस पक्षातून भाजपमध्ये आलेले आमदार हे आता पूर्णपणे भाजपमय झालेले असून त्यांनी पक्षाशी आता पूर्णपणे जुळवून घेतलेले आहे. पक्षाची नाडी ओळखून त्याप्रमाणे ते आता काम करू लागले असल्याचे नड्डा म्हणाले.

नेत्यांचा आत्मविश्‍वास वाखाणण्याजोगा
राज्यातील सर्वच भाजप नेत्यांचा आत्मविश्‍वास हा वाखाणण्याजोगा असल्याचेही ते यावेळी म्हणाले. बर्‍याच काळापासून आपले गोव्यातील नेत्यांकडे लक्ष असून त्यांचा आशावाद व कामाचा धडाका यामुळे पुढील निवडणुकीत पक्षाचा विजय निश्‍चित असल्याचे ते म्हणाले. पक्षाची येथील गाभा समितीही चांगले काम करीत आहे, असे ते पुढे म्हणाले.

मोदींच्या आशीर्वादाने राज्याचा विकास
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने गोव्याच्या विकासाला चालना मिळू लागलेली असून विकासकामांच्याबाबतीत ठेवलेली उद्दिष्टे पूर्ण होताना दिसत असल्याचे त्यांनी नमूद केले. मोप विमानतळाचे काम २०२२ च्या शेवटापर्यंत पूर्ण होणार आहे. राज्यात बायोटेन्कोलॉजीवरील प्रकल्प उभे राहत असून राज्य फार्मास्युटिकल केंद्र (हब) बनण्याच्या मार्गावर असल्याचे ते म्हणाले. राज्यात कोविड लसीकरणाला वेग आलेला असून लसीकरणाच्याबाबतीत छोट्या राज्यांत गोवा आघाडीवर असल्याचा दावा त्यांनी केला. येत्या ३१ डिसेंबरपर्यंत राज्यातील सर्व लोकांना कोविड लशीचे दोन्ही डोस देण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवलेले असून हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
आत्मनिर्भर भारत योजनेखाली गोवा सरकारने स्वयंपूर्ण गोवा योजना सुरू केलेली आहे. त्याखाली चांगला विकास साधला जात असल्याचे ते म्हणाले. राज्यातील वादग्रस्त ठरलेल्या तीन विनाशकारी केंद्रीय प्रकल्पांविषयी विचारले असता भाजप हा विकास साधणारा पक्ष आहे व हे तिन्ही प्रकल्प पक्ष पुढे नेणार असल्याचे सांगतानाच कॉंग्रेस या प्रकल्पांना आडकाठी आणत असल्याचा आरोप त्यांनी केला. वरील तीन प्रकल्यांपैकी दोन प्रकल्प हे न्यायप्रविष्ठ असून त्या प्रकल्पांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू आहे. तर एका प्रकल्पाला न्यायालयाने यापूर्वीच हिरवा कंदील दाखवला असल्याचे ते म्हणाले. खाण व म्हादई या प्रश्‍नांसंबंधी विचारले असता म्हादई प्रश्‍न हा न्यायप्रविष्ठ असून म्हादई लवादाला कार्यकाळ वाढवून दिला आहे याकडे त्यांनी अंगुलीनिर्देश केला. तर खाणीविषयी राज्य सरकारने खाणी सुरू करण्यासाठी खाण महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.

दिल्लीत कुणाला मोफत वीज मिळते?
आम आदमी पक्षाने गोव्यात सत्तेवर आल्यास राज्यातील जनतेला ३०० युनिटपर्यंतची वीज मोफत देण्याचे आश्‍वासन दिले असल्याचे त्यांच्या नजरेत आणून दिले असता तुम्ही नवी दिल्लीला जाऊन पहा. तेथे कुणालाही मोफत वीज मिळत नसल्याचे ते म्हणाले. दोन दिवसांच्या गोवा दौर्‍यात पक्षाचे आमदार, भाजप नेतृत्त्वाखालील सरकारमधील मंत्रीगण, पक्षाचे ज्येष्ठ नेते व अन्य पदाधिकारी गाभा समितचे पदाधिकारी, पक्षाचे जिल्हा समिती अध्यक्ष, मंडळ अध्यक्ष अशा सर्वांशी चर्चा करून निवडणूक रणनीती ठरवण्याचे ते म्हणाले.

पूरग्रस्तांना केंद्राकडून मदत
राज्यात नुकताच जो पूर आला त्या पुरात ज्यांचे नुकसान झाले त्या पूरग्रस्तांच्या प्रश्‍नांवरही चर्चा केल्याचे ते म्हणाले. त्याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनीही दूरध्वनीवरून संपर्क साधून या प्रश्‍नी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केल्याचे सांगून केंद्राकडून पूरग्रस्तांना मदत निधी मिळेल, असे ते म्हणाले.

ब्रह्मशानंदाचार्य स्वामींचा आशीर्वाद
श्री. नड्डा यांनी काल रविवार दि. २५ रोजी श्री क्षेत्र तपोभूमी गुरुपीठावर पीठाधीश ब्रह्मेशानंदाचार्य स्वामींचे शुभाशीर्वाद प्राप्त केले. यावेळी श्री. नड्डा यांनी, शैक्षणिक, आध्यात्मिक तसेच सामाजिक क्षेत्रात तपोभूमीचे कार्य उल्लेखनीय आहे. स्वामींचे कार्य समाजाला प्रेरणादायक तथा प्रशंसनीय असल्याचे सांगितले.