प्रज्ञेश, सुमीत पुढील फेरीत दाखल

0
98

एटीपी चॅलेंजर टूर स्पर्धांमध्ये भारताच्या पुरुष एकेरीतील खेळाडूंसाठी काल गुरुवारचा दिवस संमिश्र ठरला. प्रज्ञेश गुणेश्‍वरन व सुमीत नागल यांनी विजय संपादन केले तर रामकुमार रामनाथन याला बाहेरचा रस्ता धरावा लागला.

युएस ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेतील पदार्पणानंतर सलग दुसर्‍या चॅलेंजर दर्जाच्या स्पर्धेत खेळणार्‍या सहाव्या मानांकित सुमीत नागल याने बोस्निया येथील बेंजा लुका येथे सुरू असलेल्या स्पर्धेच्या तिसर्‍या फेरीत प्रवेश करताना मातिजा पेकोटिक याला एकतर्फी लढतीत ६-१, ६-१ अशी धूळ चारली. ‘अंतिम ८’ मध्ये त्याच्यासमोर अर्जेंटिनाचा चौथा मानांकित फेडरिको कोरिया असेल. सुमीतने पहिल्या फेरीत इव्हान नेदेलको याला ६-३, ७-६ (३) असे पराजित करत विजयी सलामी दिली होती. युएस ओपननंतर झालेल्या गिनोओ ओपनच्या पहिल्याच फेरीत नागलला गाशा गुंडाळावा लागला होता.

शांघाय येथील एटीपी स्पर्धेत अव्वल मानांकन लाभलेल्या प्रज्ञेशने गोसांलो ऑलिवेरा याला ६-३, ६-४ असे नमवत उपांत्यपूर्व फेरीत स्थान प्राप्त केले. पहिल्या फेरीतील ‘बाय’ नंतर त्याने दुसर्‍या फेरीत जेम्स वॉर्ड याचा कडवा प्रतिकार ६-४, ७-६ (३) असा मोडीत काढला होता. उपांत्य फेरीत स्थान मिळविण्यासाठी त्याला जपानच्या आठव्या मानांकित हिरोकी मोरिया याच्याशी दोन हात करावे लागणार आहेत.
दुहेरीत दिविज शरण व साकेत मायनेनी यांनी घोडदौड सुरूच ठेवताना उपांत्य फेरी गाठली. उपउपांत्य फेरीत त्यांनी तोशिहिदे मात्सुई व जॉन पॉल फ्रूटेरो यांचा ७-६, ६-३ असा पराभव केला. तत्पूर्वी, पुरुष एकेरीत शशी कुमार मुकुंद, अर्जुन काढे व साकेत मायनेनी यांना पहिल्याच फेरीत पराभव स्वीकारावा लागला. दुहेरीत श्रीराम बालाजी व विष्णू वर्धन तसेच अर्जुन काढे व विजय सुंदर प्रशांत यांना पहिल्या फेरीचा अडथळा पार करता आला नाही.

तुर्कीतील इस्तंबुल येथे सुरू असलेल्या चॅलेंजर स्पर्धेत आठव्या मानांकित रामकुमार रामनाथन याला १२व्या मानांकित स्पेनच्या निकोला कुहन याच्याकडून ६-३, ७-५ असा पराभव मान्य करावा लागला. दुहेरीत त्याने ह्युगो ग्रेनियरसह उतरताना आर्दा अझकारा व बुराक बिलगिन जोडीवर ६-४, ६-२ असा विजय प्राप्त करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. दुहेरीत पूरव राजा व रमीझ जुनैद या द्वितीय मानांकित इंडो-ऑस्ट्रेलियन जोडीने माजी क्रमांक एकची जोडी निनाद झिमोनजिच व रुबन बेलेलमान्स यांना ६-४, ६-४ असा धक्का दिला.