पोलीस बंदोबस्तात लोबो यांची सोनसडा प्रकल्पाची पाहणी

0
115

>> तीन आमदारांसह समर्थकांची निदर्शने

मडगाव, कुडतरी व फातोर्ड्याचे आमदार, राय सरपंच, पंच सदस्य, मडगावचे बहुसंख्य नगरसेवक व नागरिकांनी काल कचरा व्यवस्थापन खात्याचे मंत्री मायकल लोबो सोनसडा प्रकल्पाची पहाणी करण्यास आल्यावेळी निदर्शने केली. लोबो यांनी पोलीस संरक्षणात सोनसडा कचरा यार्डाची पहाणी केली व आपण राजकारण न करता ही समस्या सोडविण्यासाठी येथे आल्याचे सांगितले.

सोनसड्यावरील कचरा प्रक्रिया यार्डात अजूनपर्यंत कचर्‍यावर प्रक्रिया झाली नाही. त्यामुळे फातोर्डा, मडगाव व कुडतरीच्या लोकांना अतोनात त्रास झालेले आहेत. आता सरकारने तो ताब्यात घेऊन घन कचरा प्राधिकरणातर्फे कचरा प्रक्रिया केली जाईल. त्यासाठी हा प्रकल्प मोडावा लागेल व नवीन उभारण्याची गरज आहे. आपण त्यासाठी गंभीर असून मडगाव, फातोर्डा व कुडतरीचे आमदार, पंचायती व नगरपालिकेने सहकार्य करण्याची गरज आहे, असे मंत्री मायकल लोबो यांनी सांगितले.

मंत्र्यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रसन्न आचार्य व अधिकार्‍यांसमवेत पहाणी केली. त्यानंतर ते म्हणाले, मडगाव पालिकेचे मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक यांनी सरकार व कचरा व्यवस्थापन मंडळाला पत्र लिहून सहकार्य मागितले आहे. त्यानुसार आपण येथे आलो. सोनसड्यावरील प्रकल्प दोषपूर्ण असून तो आधी मोडावा लागेल व कचरा व्यवस्थापनतर्फे प्रक्रिया सुरू होईल.

लवकरच सर्वांची बैठक
साळगाव येथील प्लांटप्रमाणे हा चांगला प्रकल्प बनेल. याप्रकल्पातून नंतर गॅस निर्मिती, वीज निर्मिती करता येईल. कचरा व्यवस्थापन महामंडळ आमदार, पंचायत व पालिकेला विश्‍वासात घेऊन प्रकल्प बनवणार. लवकरच येथील तिन्ही आमदार, पालिका व पंचायतीची बैठक होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार, नगरसेवकांची निदर्शने
मंत्री मायकल लोबो पहाणी करण्यासाठी येणार असल्याने आमदार विजय सरदेसाई, दिगंबर कामत, आलेक्स रेजिनाल्ड, नगराध्यक्ष डॉ. बबिता प्रभुदेसाई, गोवा फॉरवर्डचे नगरसेवक, राय पंचायतीच्या सरपंच एझमिराल्डा गोम्स व पंच तसेच नागरिक हातात फलक घेऊन घोषणा देत सोनसोड्यावर रस्त्यालगत उभे होते. पण मंत्री लोबो तेथे न थांबता कडक पोलीस संरक्षणात प्रकल्पात गेले.