पोलीस खात्यांत कर्मचार्‍यांची भरती करणार ः मुख्यमंत्री

0
21

पोलीस खात्यात नवीन पोलीस भरती केली जाणार असून पोलीस कर्मचार्‍याची कमतरता भरून काढली जाणार आहे. पोलीस खात्याला आणखी नवीन गाड्या उपलब्ध केल्या जाणार आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत गृह, वित्त, शिक्षण, खाण व इतर खात्यांच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना काल केले.

मुंबई येथील गोवा सदनाचे काम डिसेंबर २०२२ मध्ये पूर्ण होणार आहे. वाशी मुंबई येथे भूखंड ताब्यात घेण्यासाठी कराचा भरणा करून ताब्यात घेतला पाहिजे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

अमलीपदार्थविरोधात कारवाई सुरू आहे. गुन्ह्यांच्या तपासाचे प्रमाण चांगले आहे. दक्षता खात्याकडील तक्रारीच्या तपासाला गती दिली जाणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यात होमगार्ड म्हणून १० वर्षे काम पूर्ण केलेल्यांना पोलीस खात्यांमध्ये भरतीमध्ये शारीरिक चाचणीमध्ये सूट देण्यासाठी आवश्यक तरतूद करण्याची सूचना करण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

कोकणी अकादमीसाठी नवीन इमारत, आयएएस अधिकार्‍यांना कोकणी भाषेचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. राज्य सरकारची लॉटरी दोन वर्षे बंद होती. नव्याने लॉटरी सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.

राज्यातील विद्यालयांतील माध्यान्ह आहाराचा दर्जा सुधारला पाहिजे. नववी, दहावीच्या मुलांना माध्यान्ह आहार दिला जाणार आहे. राज्यातील सर्व विद्यालयाना तीन महिन्यांत सिंगल बोर्ड सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. शिक्षण खात्याकडून स्मार्ट क्लास रूम, कर्मचारी भरती केली जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.