पोलिसांच्या जाचाला कंटाळून ‘त्या’ तिघांनी केली आत्महत्या

0
48

>> खोलीत चिठ्ठी सापडल्याने उलगडा

झुआरीनगर-वास्को येथे मंगळवारी तीन परप्रांतीयांनी पोलिसांच्या जाचाला व मारहाणीला कंटाळून आत्महत्या केल्याचे त्यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीवरून उघड झाले आहे. झुवारीनगर येथे मूळ विजापूर कर्नाटक येथील हुलगप्पा अंबीगैर, गंगाप्पा अंबीगैर व देवम्मा अंबीगैर या तिघांनी राहत्या खोलीत आत्महत्या करण्यापूर्वी कन्नड भाषेमध्ये आत्महत्येचे कारण लिहून ठेवलेली चिठ्ठी काल रात्री सापडल्याचे दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक पंकजकुमार सिंग यांनी सांगितले. एकाचवेळी एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्याचे मंगळवारी उघड झाल्यानंतर राज्यात खळबळ उडाली.

घरकाम करणार्‍या देवम्मा या महिलेवर त्या भागात असलेल्या व हे कुटुंब राहत असलेल्या चाळीचे मालक समसुद्दीन खान यांनी चोरी केल्याचा आरोप केला होता. हा आरोप तिने मान्य करावा म्हणून तिच्यावर पोलिसांनी दबाव टाकण्यात आल्याचे मृतांच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे. तसेच या महिलेच्या पतीला आणि दिराला पोलिसांनी मारहाण केली असल्याचाही आरोप त्यांच्या नातेवाइकांकडून करण्यात आला. त्यातच त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत पोलिसांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे उघड झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. चोरीची तक्रार वेर्णा पोलीस स्थानकावर दि. २४ जून रोजी करण्यात आली. तेव्हापासून दि. २९ जूनपर्यंत पोलीस त्यांची तपासणी करत होते. यामुळे या प्रकरणात संशय निर्माण होत आहे.

मृतदेह स्वीकारण्यास नकार
आत्महत्येच्या घटनेनंतर मृतांच्या नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात या तिघांची शवचिकित्सा करण्यात आली. तसेच चिकित्सेमध्ये तिघांच्याही शरीरावर कोणत्याही जखमा नसल्याचे सांगण्यात आले. मात्र पुन्हा एकदा शवचिकित्सा करण्यात यावी अशी मागणी अंबीगैर कुटुंबीयांतर्फे ऍड. आल्बेटिना आल्मेदा यांनी केली आहे.

पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संशय
एकाच खोलीत तिघांनी आत्महत्या केल्यानंतर एका तासात पोलिसांनी तिथे धाव घेऊन त्वरित पंचनामा केला व तीनही मृतदेहांची शवचिकित्सा गोवा वैद्यकीय इस्पितळात नेऊन केली. वेर्णा पोलीस स्थानकाच्या आवारात जेव्हा अपघात किंवा आत्महत्या करून मृत्यू होतो तेव्हा त्या मृतदेहावर फक्त दक्षिण गोव्यातील चिकित्सालयात पंचनामा केला जातो. मग गोमेकॉत या तिघांची शवचिकित्सा का केली असा सवाल केला जात आहे.

पोलिसांची टाळाटाळ
ही तिहेरी आत्महत्येची घटना वेर्णा पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली. त्यामुळे पत्रकारांनी येथील पोलीस निरीक्षक शरीफ जॅकीस यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. यावर पत्रकारांनी नाराजी व्यक्त केली आहे.