पेडण्यातील टॅक्सी व्यावसायिकांचे आंदोलन मागे

0
17

>> मोप विमानतळावर स्थानिक निळ्या टॅक्सींना मान्यता

>> मुख्यमंत्र्यांनी दिले लेखी पत्र

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर काळ्या पिवळ्या टॅक्सींना स्थान नसेल परंतु निळ्या टॅक्सींना स्टँड देण्याचे कबूल करून त्याप्रमाणे लेखी पत्र व्यावसायिकांना आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या हस्ते दिले. त्यानंतर व्यावसायिकांनी जल्लोष करत आमदार आर्लेकर यांनी आम्हाला न्याय मिळवून दिल्याचे सांगत आनंद साजरा केला व आपले आंदोलन मागे घेतले.

यावेळी आमदार आर्लेकर यांनी, आपण सदैव पेडणेवासीयांसोबत होतो आणि राहणार आहे असे सांगून टॅक्सी व्यावसायिकांचा प्रश्न आपण सुरुवातीपासून सरकार दरबारी मांडला. आज लेखी स्वरूपातील तसे पत्र आपण टॅक्सी व्यावसायिकांच्या संघटनेच्या पदाधिकार्‍यांकडे सुपूर्द केले असल्याचे सांगितले.

टॅक्सी व्यावसायिकांचे नेते सुदीप ताम्हणकर यांनी, आमदार आर्लेकर यांनी आश्‍वासन दिल्यानुसार त्याची पूर्तता त्यांनी स्वतः मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची भेट घेऊन केली आहे. त्याबद्दल समाधान व्यक्त केली. उर्वरित जे काही प्रश्‍न आहेत ते भविष्यात टप्प्याटप्प्याने संघटित होऊन सोडवावेत अशी मागणी केली.

जीएमआर कंपनीची सूचना
मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पेडणे तालुक्यातील काळ्या-पिवळ्या टॅक्सी व्यावसायिक संघटनेने विमानतळावर स्थानक मिळवण्यासाठी आंदोलन केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तशी ग्वाही दिली होती. परंतु विमानतळ प्रकल्प उभारणी करणार्‍या जीएमआर कंपनीने ब्ल्यू टॅक्सी स्टॅण्ड उपलब्ध करावा अशी सूचना सरकारला केल्यानंतर निळ्या टॅक्सी स्टँडला मान्यता देण्यात आली. त्याला व्यावसायिकांनीही आपली संमती दर्शवली. परंतु जोपर्यंत लेखी आश्वासन मुख्यमंत्री डॉ. सावंत आम्हाला देत नाही. तोपर्यंत आम्ही आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या निवासस्थानावरून हटणार नाही. अशी भूमिका २०० पेक्षा जास्त व्यावसायिकांनी घेतली. शेवटी आमदार आर्लेकर यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून आम्ही सायंकाळी चारपर्यंत तुम्हाला लेखी आश्वासन आणून देत असल्याचे सांगितले.

यावेळी ताम्हणकर यांनी, दि. ५ रोजी सायंकाळी पाचपर्यंत जर योग्य तो न्याय आम्हाला मिळाला नाही तर पुढील कृती आम्ही करणार असल्याचा इशारा दिला. काळ्या पिवळ्या टॅक्सीऐवजी निळे टॅक्सी स्टँड देणार ते टॅक्सी व्यावसायिकांना मान्य असल्याचे सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांकडून लेखी पत्र आमदार आर्लेकर यांनी आणून ते आंदोलकांकडे सुपूर्द केल्यानंतर टॅक्सी व्यावसायिकांनी आंदोलन मागे घेतले.

आंदोलनकर्ते आमदार आर्लेकरांच्या दारी

मोप विमानतळावरून कालपासून विमानोड्डाण सुरू झाले. यावेळी कोणताच अनुचित प्रकार घडू नये म्हणून सरकारने मोप विमानतळावर जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गावर १४४ कलम लागू करत चारपेक्षा जास्त नागरिकांना रस्त्यावर जमण्यास निर्बंध घातले. त्यामुळे पेडणे तालुक्यातील टॅक्सी व्यावसायिकांनी थेट आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या धारगळ निवासस्थानी धडक दिली. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, लेखी आश्‍वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमदाराच्या निवासस्थानाहून हटणार नाही असा पवित्रा या व्यावसायिकांनी घेतला.

विमानतळावर दिसणार
निळ्या टॅक्सी
आता मोप विमानतळ परिसरात काळ्या पिवळ्याऐवजी निळ्या टॅक्सी मोठ्या प्रमाणात दिसणार आहेत. मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून काल गुरूवारी सकाळी इंडिगो या कंपनीचे पहिले विमान हैदराबाद येथून थेट मोपवर उतरले. या विमानात असलेल्या प्रवाशांचे भव्य स्वागत करण्यासाठी जीएमआर कंपनीचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

पोलिसांचा फौजफाटा
मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिल्या विमानाचे उड्डाण सुरू झाल्यानंतर या परिसरात कसल्याच प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये किंवा आंदोलनकर्ते आणि प्रवाशांना अडवण्याचाही प्रयत्न होऊ शकतो या शक्यतेतून सरकारने धारगळ सुकेकुळण ते विमानतळापर्यंत ठिकठिकाणी पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पेडणे पोलीस निरीक्षक दत्ताराम राऊत हे स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या निवासस्थानी जम्या झालेल्या टॅख्सी व्यावसायिकांवर नजर ठेवून होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ डिसेंबर रोजी मोप विमानतळाचे उद्घाटन केले होते. परंतु काल गुरूवार दि. ५ रोजी खर्‍या अर्थाने इंडिगो कंपनीचे पहिले विमान विमानतळावर उतरले आणि विमानतळ सुरू झाल्याचे समाधान नागरिकांत होते.

जीत आरोलकर यांना वगळले
मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांना काल पहिल्या विमान उतरण स्वागत कार्यक्रमाला कंपनीने डावलल्याचे दिसून आले. इतर आजी-माजी आमदारांना कंपनीने खास निमंत्रणे पाठवली. परंतु मांद्रेचे आमदार हे सरकारात असूनदेखील त्यांना वगळल्यामुळे त्यांचे समर्थक नाराज बनलेले आहेत.

प्रवाशांना वाहतूक सेवा नाही
आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलेल्या विमान प्रवाशांना त्यांच्या नियोजित स्थळी जाण्यासाठी वाहने उपलब्ध नव्हती. शेवटी जीएमआर कंपनीलाच काही प्रवाशांना मोफत वाहने उपलब्ध करून नियोजित स्थळी पोहोचवावे लागले. तसेच आलेल्या ज्येष्ठ प्रवाशांना बसण्यासाठी आसन व्यवस्थाही नव्हती.

दिवसभरात १४ उड्डाणे
हैदराबादहून इंडिगोचे ६ ई ६१४५ हे १७९ प्रवाशांसह उतरणारे पहिले विमान आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिल्ली-गोवा या विमानाला हिरवा झेंडा दाखवला. पहिल्या दिवशी संध्याकाळी ४ वाजेपर्यंत विमानतळाने १४ उड्डाणे हाताळली. तसेच, २४४१ प्रवाशांचे स्वागत करण्यात आले. विमानतळाच्या अत्याधुनिक बॅग हाताळणी यंत्रणेने संध्याकाळी ४ वाजेपर्यंत ९५३ बॅगची हाताळणी केली.