पेट्रोल – डिझेल व गॅसच्या दरवाढीवरून ‘आप’ची टीका

0
161

पेट्रोल, डिझेल व गॅस सिलिंडर आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या सतत वाढत जाणार्‍या दरांच्या प्रश्‍नावरून काल आम आदमी पार्टीच्या महिला विभागाने सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका केली.
या संबंधी बोलताना पॅट्रिशिया फर्नांडिस म्हणाल्या की, देशात पेट्रोल, डिझेल व गॅस सिलिंडरच्या किंमती रोज वाढू लागलेल्या असून त्यामुळे सामान्य लोकांचे जगणेच कठीण बनले आहे. पेट्रोल व डिझेल बरोबरच आता एलपीजी दरही सरकारने वाढवले असून त्यावरील अनुदानही सरकारने काढून टाकले असल्याचे फर्नांडिस यांनी स्पष्ट केले. देशातील गरीब जनतेने पुन्हा एकदा लाकडांचा वापर करून चुली पेटवाव्यात अशी मोदी सरकारची इच्छा आहे काय, असा सवालही फर्नांडिस यांनी केला. पेट्रोलच्या वाढत्या किंमतीमुळे यापुढे लोकांना एक तर सायकली घेऊन अथवा चालून प्रवास करावा लागेल, असेही फर्नांडिस म्हणाल्या. राज्यातील प्रशासन सध्या रामभरोसे चालू असून स्वयंपूर्ण गोवा ही तर फार दूरची गोष्ट असल्याचा दावाही त्यांनी केला. भाजप व कॉंग्रेस या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू असून आतापर्यंत या दोन पक्षांच्या हातातच सत्ता राहिली. त्यांच्या भ्रष्ट राजवटीमुळे गरीब जनता गरीबच राहिली असल्याचा आरोपही फर्नांडिस यांनी केला.