पेटते काश्मीर

0
110

काश्मीरमधील परिस्थिती दिवसेंदिवस हाताबाहेर चालली आहे. केवळ लष्कराच्या जोरावर ती नियंत्रणात ठेवली गेली असली, तरी मेहबुबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखालील राज्य प्रशासन परिस्थिती हाताळण्यात पूर्णतः असफल आणि हतबल ठरले आहे. नुकतेच विधानसभेत बोलताना त्यांनी ‘संवादाद्वारेच काश्मीर प्रश्न सुटेल’ असे विधान केले. संवाद कोणाशी साधायचा? रस्तोरस्ती मृत्यूचे थैमान मांडलेल्या अतिरेक्यांशी? त्यांना शस्त्रास्त्रे आणि पैसा पुरवणार्‍या पाकिस्तानशी? की काश्मीर खोर्‍यातील देशद्रोही हुर्रियत नेत्यांशी? जेथे विरोधी पक्षनेते उमर अब्दुल्ला आणि त्यांचे पिताश्रीच दहशतवाद्यांची अप्रत्यक्ष कड घेऊन आज बोलू लागलेले आहेत, जेथे खुद्द मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती स्वतःचे अपयश झाकण्यासाठी आणि जनतेचा बुडत्याला काडीचा आधार मिळवण्यासाठी फुटिरतावाद्यांची कड घेणारी विधाने करू लागल्या आहेत, तेथे केंद्र सरकारने संवाद साधायचा कोणाशी? यापूर्वी अटलबिहारी वाजपेयी यांनी संवादाला चालना दिली होती. डॉ. मनमोहनसिंग यांच्या कार्यकाळात तर अनेक कृती गट स्थापन करण्यात आले होते. परंतु तेव्हाची परिस्थिती आणि आजची परिस्थिती यामध्ये जमीन अस्मानाचा फरक दिसतो आहे. जोवर दहशतवादी पाकिस्तानातून यायचे आणि घातपात घडवायचे, तोवर बहुतांशी काश्मिरी जनता तटस्थ राहायची. पण आज खुद्द काश्मीर खोर्‍यातून स्थानिक दहशतवाद्यांच्या फौजा निर्माण होत आहेत. त्यांना स्थानिक जनतेचे प्रचंड पाठबळ दिसते आहे. बुरहान वानी, सबजार भट, परवाच अचबलमध्ये मारला गेलेला जुनैद मट्टू या दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारांना स्थानिक तरुणांचे लोंढे लोटत आहेत. नुकत्याच जुनैद मट्टूच्या अंत्ययात्रेवेळी तर दहशतवादी बंदुकांच्या फैरी झाडत सहभागी झालेले होते. काश्मिरी सैन्याधिकारी, पोलीस यांच्यावर हल्ले होत आहेत. नुकतेच सहा पोलिसांना ठार मारून त्यांच्या देहांची विटंबना करण्यात आली. सरकारच्या सेवेत असलेल्या स्थानिक जनतेमध्ये दहशत निर्माण करण्याचा हा पद्धतशीर प्रयत्न आहे. अशावेळी ज्यांनी जनतेमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करायचे ते राजकारणी पलायनवाद स्वीकारत आहेत. उघडउघड फुटिरांची कड घेऊ लागले आहेत. केंद्रीय गृहराज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी नुकताच अशा लोकांचा उल्लेख ‘निम फुटिरतावादी’ असा यथार्थ शब्दांमध्ये केला. काश्मीर जळत असताना विरोधी पक्षनेते उमर अब्दुल्ला, त्यांचे वडील फारुख अब्दुल्ला विदेशांत विश्रांती घेत आहेत. काश्मीर पेटवणार्‍या हुर्रियत नेत्यांची मुलेबाळे विदेशांत शिक्षण घेत आहेत. हुर्रियतच्या काही नेत्यांचा आणि काही बड्या काश्मिरी व्यापार्‍यांचा बुरखा वृत्तवाहिन्यांनी फाडला. पाकिस्तानकडून या मंडळींना कसा प्रचंड पैसा येतो, बदामापासून अमली पदार्थांपर्यंतच्या व्यवहारांतून येणारा पैसा दहशतवाद्यांपर्यंत कसा पोहोचतो, पाकिस्तानच्या पैशावर कसे इमले उभारले गेले, या सगळ्या गोष्टी समोर आल्या आहेत. संवाद जरूर व्हायला हवा, परंतु त्यासाठी आधी विश्वासाचे वातावरण तर हवे. ती जबाबदारी कोणी आपल्या शिरावर घ्यायची? दुबळे राज्य सरकार, पळपुटे विरोधक आणि कोंडीत सापडलेले केंद्र सरकार यांनी काश्मीरचा सत्यानाश चालवला आहे. आजवर झालेले संवादाचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले त्यात या अविश्वासाचे मूळ आहे. जिज्ञासूंनी काश्मीरचा तिढा समजून घेण्यासाठी जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल जगमोहन यांचे ‘माय फ्रोझन टर्ब्युलन्स इन काश्मीर’ हे भलेथोरले पुस्तक जरूर वाचावे. राजकीय स्वार्थासाठी काश्मीरचा कसकसा बळी दिला गेला ते त्यात दिसेल. काश्मीर वाचवायला हवा. निश्‍चित वाचवायला हवा, परंतु त्यासाठी अत्यंत प्रामाणिक, व्यापक आणि ठोस प्रयत्नांची नितांत आवश्यकता आहे.