पेगासस वरून संसदेत गदारोळ

0
117

>> राहुल गांधींसह अनेक बड्या नेत्यांची हेरगिरी; कॉंग्रेसचे केंद्रावर टीकास्त्र

पेगासस हेरगिरी प्रकरणावरून सध्या देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनास कालपासून सुरुवात झाली असून, पहिल्याच दिवशी याच पेगासस प्रकरणावरून मोठा गदारोळ झाला. दरम्यान, कॉंग्रेस नेते राहुल गांधी, निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर, माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यासह अश्विनी वैष्णव आणि प्रल्हाद पटेल या दोन केंद्रीय मंत्र्यांची नावे हेरगिरी प्रकरणी लीक झालेल्या यादीत आहेत. हा प्रकार समोर आल्यानंतर कॉंग्रेसने केंद्रावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

लोकसभेत काल सकाळी कामकाजाला सुरुवात होताच विरोधकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. कॉंग्रेस, तृणमूल कॉंग्रेस, बसपा आणि अकाली दलाच्या खासदारांनी पेगासस हेरगिरी प्रकरण, पेट्रोल-डिझेल-गॅस दरवाढ, महागाई, शेतकरी आंदोलन आणि अन्य मुद्यांवरून सभागृहात घोषणाबाजी सुरू केली. परिणामी अनेक वेळा दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब करावे लागले.

दरम्यान, हेरगिरी प्रकरणी लीक झालेल्या यादीत ३०० भारतीय मोबाईल नंबर आहेत. त्यापैकी ४० मोबाईल नंबर हे भारतीय पत्रकारांचे आहेत. तसेच विरोधी पक्षातील ३ मोठे नेते, संरक्षण संस्थेतील प्रमुख अधिकारी आणि उद्योगपतींचा यात समावेश आहे. या मोबाईल नंबरवर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पाळत ठेवण्यात आली होती, असा खुलासाही यात करण्यात आला आहे.

वैष्णव, शहांकडून
अहवालावर संशय

माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या एक दिवस आधी पत्रकारांकडून अशा बातम्या येणे हा योगायोग असू शकत नाही, अशा शब्दांत वैष्णव यांनी या अहवालावर संशय व्यक्त केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा याबाबतच्या बातम्यांचे खंडन केले आहे. जाणीवपूर्णव अशा बातम्या पेरल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.