पेगासस, कृषी कायदे, महागाई प्रश्‍नांवरून लोकसभेत गदारोळ

0
36

लोकसभा अध्यक्षांच्या दिशेने कागदपत्रे भिरकावल्याने आणि सभागृहात गैरवर्तन केल्याप्रकरणी लोकसभेतील १० खासदारांवर निलंबनाची टांगती तलवार आहे. गुरजित सिंग औजला, टी. एन. प्रथापन, मणिकम टागोर, रवनीत सिंग बिट्टू, हिबी ईडेन, ज्योती मणी सेन्नमलई, सप्तगिरी संकर उलका, वी. वैथिलिंगम आणि ए. एम. आरीफ या खासदारांचं निलंबन होण्याची शक्यता आहे.

पेगासस हेरगिरी, महागाई आणि कृषी कायद्यांविरोधात संसदेत विरोधकांनी बुधवारी गदारोळ केला. लोकसभेत विरोधी पक्षाच्या काही खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या दिशेने कागदपत्रे भिरकावली आणि ‘खेला होबे’ अशी घोषणाबाजी केली. यामुळे सभागृहाचे कामकाज दुपारी १२.३० पर्यंत आणि नंतर २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. दुपारी २ वाजता कामकाज सुरू करताच पुन्हा विरोधकांनी गोंधळ सुरू केला. त्यामुळे अखेर गुरूवारी सकाळी ११ वाजेपर्यंत सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.

राज्यसभेतही कामकाज सुरू होताच विरोधी पक्षांनी गदारोळ केला. यामुळे सभागृहाचे कामकाज आधी दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. यानंतर १२ वाजता कामकाज सुरू झाल्यावर विरोधकांचा गदारोळ सुरूच होता. यामुळे दुपारी २ वाजेपर्यंत कामकाज तहकूब केले गेले. पण नंतर सभागृहाचे कामकाज गुरुवारी ११ वाजेपर्यंत तहकूब केले गेले.