पूरग्रस्त शेतकर्‍यांना ऑगस्ट महिन्यात भरपाई ः कवळेकर

0
35

पुरामुळे ज्या शेतकर्‍यांचे नुकसान झालेले आहे त्या शेतकर्‍यांना येत्या ऑगस्ट महिन्यात नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याचे कृषिमंत्री बाबू कवळेकर यांनी काल गोवा विधानसभेत सांगितले. प्रश्‍नोत्तराच्या तासाला आमदार विनोद पालयेकर यांनी विचारलेल्या प्रश्‍नावर कवळेकर यांनी वरील माहिती दिली. गेल्या वर्षी आलेल्या पुरामुळे ज्या शेतकर्‍यांचे नुकसान झाले त्यातील बर्‍याच शेतकर्‍यांना यापूर्वीच नुकसानभरपाई देण्यात आलेली आहे.

केवळ ११९ शेतकर्‍यांना भरपाई मिळायची आहे. त्यांना तसेच यंदाच्या वर्षी ज्यांचे नुकसान झालेले आहे त्या १२४४ शेतकर्‍यांना पुढील महिन्यात नुकसानभरपाई देण्यात येईल, असे कवळेकर यांनी काल सभागृहात सांगितले. मागच्या वर्षी ज्या शेतकर्‍यांचे नुकसान झाले त्यापैकी काही शेतकर्‍यांनी भरपाईसाठी उशिरा अर्ज केले होते, त्यामुळे त्यांना भरपाई देता आली नाही. शिवाय कोविड महामारीमुळे केंद्राकडूनही त्यासाठीचा निधी येण्यास विलंब झाल्याची माहिती कवळेकर यांनी दिली.
यावेळी आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी गेल्या तीन-चार वर्षांपासून राज्यात पूर येत असून त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे ही बाब लक्षात घेऊन सरकारने त्यांच्यासाठी विमा योजना तयार करावी, अशी सूचना केली.

विजय सरदेसाई यांनी शेतकर्‍यांना नुकसानभरपाई देण्यास विलंब होत असल्याबद्दल सरकारवर टीका केली. शेतकरी आपले सगळे पैसे खर्च करून शेती करतो आणि एका रात्रीत पुरामुळे त्यांचे होत्याचे नव्हते होऊन जाते, हे सरकारने लक्षात घ्यायला हवे, असे सांगून शेतकर्‍यांना विनाविलंब नुकसानभरपाई दिली जावी अशी मागणी केली.

यावेळी कवळेकर यांनी येत्या ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शेतकर्‍यांना नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याचे सांगितले.