पुरामुळे घरे कोसळलेल्यांना १५ ऑगस्टपूर्वी भरपाई : मुख्यमंत्री

0
86

हल्लीच आलेल्या पुरामुळे राज्यात ज्या लोकांची घरे कोसळली त्यांना १५ ऑगस्टपूर्वी घरे बांधण्यासाठी नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल त्यासंबंधीच्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना सांगितले. ज्यांची मातीची घरे होती त्यांना प्रत्येकी २ लाख रु. एवढी भरपाई देण्यात येईल.

ज्यांची घरे कोसळलेली नाहीत पण घरांचे मोठे नुकसान झालेले आहे अशा लोकांना १ लाख रु. पर्यंतची मदत देण्यात येणार आहे. तर ज्यांच्या घरांचे किरकोळ स्वरूपाचे नुकसान झालेले आहे अशा लोकांना प्रत्येकी २५ हजार रु. एवढी नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. पुरामुळे दोघांचा मृत्यू झालेला असून या मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४ लाख रु. एवढी नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यानी दिली.

घरे बांधण्यासाठी लोकांना १५ ऑगस्टपर्यंत मदत देण्यात येणार असून ज्यांचे कमी स्वरूपाचे नुकसान झालेले आहे त्यांना सप्टेंबर महिन्यापर्यंत भरपाई देण्यात येणार असल्याची माहिती सावंत यांनी दिली. ज्यांची घरे कोसळल्याने सगळे काही ढिगार्‍याखाली गेले अशा लोकांना यापूर्वीच सरकारने अन्नधान्य, कपडे. चादरी व अन्य आवश्यक ते साहित्य पुरविले असल्याचे सावंत यांनी यावेळी सांगितले.

सरकारने पुरामुळे झालेल्या नुकसानाचा अंदाज खर्च तयार केलेला असून तो ९२ लाख रु. एवढा असल्याची माहिती सावंत यांनी दिली. पूरग्रस्तांना नुकसानभरपाई देता यावी यासाठी सरकारने केंद्राकडे निधीची मागणी केली असल्याची माहितीही सावंत यांनी यावेळी दिली.

यावेळी बोलताना विरोधी आमदारांनी सरकारकडे लोकांना तुटपुंजी नुकसानभरपाई न देता त्यांचे जेवढे नुकसान झालेले आहे ते लक्षात घेऊन त्यानुसार भरपाई देण्याची मागणी केली. तौक्ते चक्रीवादळाच्या वेळी ज्या लोकांचे नुकसान झाले होते त्यांना अद्याप भरपाई मिळाली नसल्याचेही विरोधी आमदारांनी सांगितले. यावेळी बोलताना विजय सरदेसाई यांनी, पुरामुळे जनतेचे कोट्यवधी रु.चे नुकसान झालेले असताना सरकारने नुकसानाचा आकडा केवळ ९२ लाख रु. कसा काय ठरवला, असा प्रश्‍न उपस्थित केला. मृतांच्या कुटुंबियांना ४ लाख रु. नुकसानभरपाई देणे ही त्यांची थट्टा असून त्यांना जास्त भरपाई द्यायला हवी, अशी सूचना आमदार रोहन खंवटे यांनी केली.

सुदिन ढवळीकर यांनी दोन लाख रु. घर बांधणे शक्य नसून ज्यांची घरे कोसळली आहेत त्यांना जास्त नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी केली. रवी नाईक, दिगंबर कामत, प्रतापसिंह राणे आदींनीही यावेळी महत्त्वाच्या सूचना केल्या.सगळ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर लोकांना योग्य तेवढी नुकसानभरपाई देण्यात येईल असे आश्‍वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.