पुन्हा बुरहान

0
149

आज ८ जुलै ही आपल्यासाठी जीवनावर भरभरून प्रेम केलेले आनंदयात्री कवी बा. भ. बोरकर यांची पुण्यतिथी. तिकडे काश्मीरमध्ये मात्र, मृत्यूचा दूत बनून वावरलेला हिज्बूल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वानी याचा खात्मा झाला त्याला आज एक वर्ष पूर्ण होते आहे. बुरहानचा खात्मा ही काश्मीरच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वाची घटना ठरली. काश्मीर प्रश्नाची सारी समिकरणेच त्यातून पालटून गेली आणि फुटिरतावाद कैक पटींनी पसरत गेला. एकमेकांशी मतभेद असलेले काश्मिरी नेतेही ‘बुरहान’च्या विषयात एकत्र आले आणि काश्मीरच्या संघर्षाचे एक नवे हिंसक, अधिक आक्रमक पर्वही त्यानंतर सुरू झाले. बुरहान वानीपूर्वी पाकिस्तानातून येणारे दहशतवादी काश्मीरमध्ये घातपात घडवीत असत. परंतु बुरहान हा स्थानिक तरूण. सोशल मीडियाच्या द्वारे स्वतःची सशस्त्र छायाचित्रे, व्हिडिओ पसरवत त्याने जणू दहशतवादाचा ‘पोस्टर बॉय’म्हणून स्वतःला प्रस्तुत केले आणि अस्वस्थ काश्मिरी तरुणाईला चिथावणी देत हिंसेच्या मार्गावर आकृष्ट केले. शेवटी त्याला कोकरनागच्या बेमदुरामध्ये सुरक्षा दलांनी ठार मारले, परंतु त्याच्या अंत्ययात्रेला जवळजवळ दोन लाख काश्मिरी तरूण उपस्थित राहिले आणि तेव्हापासून बुरहानला ‘शहीद’ ठरवण्याची आणि त्याच्या उदात्तीकरणाची स्पर्धाच तमाम काश्मिरी नेत्यांमध्ये सुरू झाली. मग ते हुर्रियतचे असोत, कॉंग्रेसचे असोत वा सत्ताधारी पीडीपीचे. वास्तविक ही दहशतवादापुढे त्यांनी टेकलेली शरणागती होती, परंतु स्वतःचे अस्तित्व आणि नेतृत्व टिकवण्यासाठी या मंडळींना हे करणे भाग पडले. उदाहरणादाखल कॉंग्रेसचे खासदार सैफुद्दिन सोझ यांची प्रतिक्रिया पाहा. ‘‘मला शक्य असते तर बुरहानला जिवंत ठेवून मी त्याच्याशी संवाद साधला असता’’ असे या सौझ महाशयांचे म्हणणे. यांच्याच नाहिदा इम्तियाज या मुलीला एकदा दहशतवाद्यांनी पळवून नेलेले होते. त्याच्या बदल्यात अनेक दहशतवाद्यांची सुटका तेव्हा केली गेली. आता या महाशयांना दहशतवाद्यांशी ‘संवाद’ साधण्याची खुमखुमी आली आहे. हे दुसरे तिसरे काही नाही. ही फुटिरतावाद्यांच्या वाढत्या ताकदीच्या तुष्टीकरणाची केविलवाणी धडपड आहे. आता बुरहानच्या ‘हौतात्म्या’च्या वर्षपूर्तीनिमित्ताने आज काश्मीर बंद पाडले जाईल, त्याच्या त्रालमधील गावी असलेल्या थडग्याजवळ लाखोंची गर्दी जमवण्याचा प्रयत्न होईल आणि प्रक्षोभक भाषणे करून काश्मीर पेटवण्याचे मनसुबे जाहीर केले जातील. सुरक्षा दलांनी अर्थात हे हाणून पाडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालवले आहेत. एकवीस हजार अतिरिक्त फौजा पाठवल्या गेल्या आहेत, सोशल मीडियावरून एकत्रीकरण होऊ नये म्हणून इंटरनेटवर कालपासून खोर्‍यात बंदी घातली गेली आहे, संवेदनशील भागांत संचारबंदी जारी झाली आहे, हजारोंना प्रतिबंधात्मक अटक करण्यात आली आहे. परंतु तरीही आज काश्मीरमध्ये काही अघटित घडण्याची भीती नाकारता येत नाही. सध्या खोर्‍यात अमरनाथ यात्रा सुरू आहे. त्या यात्रेवर दहशतवादाचे संकट घोंगावते आहे. बुरहानच्या मृत्यूचा संपूर्ण आठवडा ‘हप्ता शहादत’ म्हणून दहशतवाद्यांनी घोषित केलेला आहे. त्याच्यासाठी तरूण फतेह प्रार्थना करीत आहेत. त्यामुळे बुरहानच्या हत्येचा सूड म्हणून एका बाजूने दहशतवादी हल्ले आणि दुसर्‍या बाजूने हिंसक निदर्शने यांचा आगडोंब काश्मीरमध्ये उसळवण्यासाठी पाकिस्तान आतुर आहे. खोर्‍यात झाडा झाडांवर, वीज खांबांवर ‘गो इंडिया गो बॅक’ चे फलक लावले गेले आहेत, बुरहानच्या समर्थनार्थ होर्डिंग लागली आहेत. हा सगळा वातावरणनिर्मितीचा पद्धतशीर प्रयत्न आहे. या आव्हानाला जम्मू काश्मीर प्रशासन आणि सुरक्षा दले कसे तोंड देतात त्यावरून काश्मीरवर भारताचे किती नियंत्रण आहे हे सिद्ध होणार आहे. त्यामुळे आज अवघ्या जगाचे काश्मीरकडे लक्ष आहे. ही जागतिक प्रसिद्धी मिळवण्याची आयती संधी तेथील प्रशासनाने आणि सुरक्षा दलाने फुटिरांच्या हाती देता कामा नये.