पुन्हा पुलवामा

0
132

सुरक्षा दलाची शोधमोहीम सुरू असताना काल पुलवामा जिल्ह्यामध्ये लष्कर ए तय्यबाच्या दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला भारतीय लष्कराने दिलेल्या खमक्या प्रत्युत्तरात पाच दहशतवादी ठार झाले. गेल्या काही दिवसांतील ही भारतीय लष्कराची फत्ते झालेली अशा प्रकारची सर्वांत मोठी कामगिरी म्हणावी लागेल. पुलवामा म्हटले की आपल्याला गेल्या वेळेस तेथे आपल्या सुरक्षा दलांच्या ताफ्यावर झालेला भीषण दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर त्याचे उमटलेले पडसाद नक्कीच आठवतात. कालची चकमक प्रत्यक्ष पुलवाम्यात झालेली नाही, तर पुलवामा जिल्ह्यातील हंजन नावाच्या दूरच्या गावी झाली आहे. काश्मीरमध्ये कुठेही काही खुट्ट झाले तरी बातम्यांमध्ये जिल्ह्याच्या नावाने ती बातमी दिली जात असते. त्यामुळे विशेषतः दक्षिण काश्मीरमधील जिल्ह्यांची ही ठिकाणे म्हणजे दहशतवाद्यांच्या कारवाईने खदखदणारे भाग आहेत असा आपला समज होत असतो. प्रत्यक्षात काश्मीर गेल्या वेळेपेक्षा आज कमालीचे शांत आहे. ते पेटवण्याचा अत्यंत आटोकाट प्रयत्न पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून आणि त्यांच्या खोर्‍यातील हस्तकांकडून जरूर चालला आहे, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अलीकडेच बोलावलेली काश्मीर खोर्‍यातील सर्वपक्षीय नेत्यांची बैठक, तिला खोर्‍यातील सर्व राजकीय नेत्यांनी मागील कटु गोष्टी विसरून दिलेला सकारात्मक प्रतिसाद, त्या बैठकीमध्ये ३७० कलम हटविण्याच्या आपल्या मागणीवर सोईस्कररीत्या साधलेली चुप्पी ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर काश्मीरमध्ये लोकशाही प्रक्रिया पुन्हा सुरू होण्याची आशा कधी नव्हे एवढी जागलेली आहे. त्यामुळे बिथरून गेलेले दहशतवादी काहीही करून काश्मीर अशांत आहे असे चित्र जगापुढे उभे करण्यासाठी कामाला लागले आहेत.
पाकिस्तानच्या पाठबळावर हे सगळे वर्षानुवर्षे चालत आलेले आहे, हे तर उघड गुपीत आहे. काही दिवसांपूर्वीच जम्मूतील हवाई दलाच्या तळावर दोन द्रोनमधून स्फोटके टाकून स्फोट घडवण्यात आले. सुदैवाने त्यामध्ये फारशी हानी किंवा प्राणहानी झाली नाही, परंतु द्रोन हल्ल्यांचे एक नवे तंत्र आता दहशतवादी आजमावणार आहेत हे स्पष्ट झाले. लागोपाठ जम्मूतील लष्करी तळावरही द्रोन येऊन गेल्याचे दिसले आणि आता तर खुद्द पाकिस्तानातील इस्लामाबादेतील भारतीय दूतावासावरून द्रोन दोनवेळा येऊन गेल्याची घटना समोर आली आहे. ह्या दूतावासातील निवासी विभागात भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमांचा शुभारंभ बॉलिवूड रजनीद्वारे होणार होता तेव्हाच गेल्या २६ जूनच्या रात्री आकाशात हे द्रोन दिसले. म्हणजेच एकीकडे जम्मूतील हवाई दलाच्या ठाण्यावर द्रोन हल्ला चढविला जात असताना खुद्द पाकिस्तानातही भारतीय दूतावासावर अशा प्रकारे द्रोनद्वारे टेहळणी केली जाणे ह्या दोन्ही घटना निव्वळ योगायोग नसावा. भारत सरकारने दहशतवाद्यांच्या नव्या रणनीतीची अगदी युद्धपातळीवर दखल घेतली आणि सरकार आता द्रोनविषयक नियम अधिक कडक करायला निघाले आहे. प्रत्येकवेळी हल्ल्याचे नवनवे मार्ग शोधून सुरक्षा यंत्रणांना चकवू पाहणार्‍या दहशतवाद्यांच्या पुढे आपण एक पाऊल आहोत हे दाखवून दिल्याखेरीज दहशतवादावर नियंत्रण ठेवता येत नसते.
काश्मीर खोर्‍यामध्ये दहशतवादाचा उत्पात चालला होता, तेव्हा गोळीला गोळीने प्रत्युत्तराची कठोर नीती अमलात आणून लष्कराने दहशतवादाचा कणा मोडला. मुख्य म्हणजे भारत सरकारने दहशतवादाची आर्थिक रसद यथास्थित तोडून टाकली. आंतरराष्ट्रीय घुसखोरीवरही बर्‍याच प्रमाणात नियंत्रण आलेले आहे. त्यामुळे सध्या पाकिस्तानातून भारतीय हद्दीत घुसून दहशतवादी हल्ले चढवण्याचे बेत तडीस नेणे कठीण बनलेले असल्यानेच द्रोनचा पर्याय दहशतवाद्यांनी हाताळणे सुरू केले असावे. काल पुलवाम्यात जे पाच दहशतवादी मारले गेले, त्यामध्ये केवळ एक दहशतवादी पाकिस्तानी आहे हे उल्लेखनीय आहे. याचाच अर्थ पाकिस्तानातून काश्मीर खोर्‍यामध्ये दहशतवादी घुसवणे पूर्वीइतके आता सोपे बनलेले नसल्याने तुरळक दहशतवादी पाठवून स्थानिक दहशतवाद्यांचे संघटन उभारून हल्ले चढवण्याची रणनीती लष्कर ए तय्यबासारख्या दहशतवादी संघटनांनी सध्या आखलेली आहे. पुलवाम्यात खात्मा झालेल्यांपैकी दोघे पुलवाम्यातील तर एक श्रीनगरमधील आहे आणि विशेष यश म्हणजे लष्कर ए तय्यबाचा जिल्हा कमांडर निशाझ लोन हाही काल मारला गेला आहे. दहशतवाद्यांना दयामाया न दाखवण्याची भारत सरकारची रणनीती काम करते आहे. पंजाबमधील दहशतवादाचाही असाच ‘बुलेट फॉर बुलेट’ रणनीतीने खात्मा करण्यात आपल्याला यश आले होते. मानवाधिकारांचे ढोंग बाजूला ठेवून दहशतवादासारख्या गोष्टींचा कठोरपणेच सामना झाला पाहिजे. ज्यांना निरपराधांच्या प्राणांची तमा नसते त्यांना कसला आला आहे मानवाधिकार? दहशतवादाचा कणा मोडतानाच आता गरज आहे ती काश्मीरमध्ये लोकशाहीच्या पुनर्स्थापनेला वेग देण्याची!