पुन्हा एकांडा हल्ला

0
154

न्यूयॉर्कमधील जगाची आर्थिक राजधानी गणल्या जाणार्‍या मॅनहॅटन भागात काल एका माथेफिरूने एकांडा हल्ला केला. भाड्याने घेतलेली पिकअप त्याने पादचार्‍यांच्या आणि सायकलस्वारांच्या गर्दीत घुसवल्याने आठ जणांचा बळी गेला, तर कित्येक जण जखमी झाले. वर वर पाहता ही घटना तशी छोटी वाटेल, परंतु तिला अनेक परींनी मोठा अर्थ आहे. पहिली गोष्ट म्हणजे या हल्ल्यामागे आयसिसच्या विचारधारेचा सैफुल्ला सैपोव्ह हा उझ्बेक माथेफिरू असल्याचे तपासात उघड झाले आहे. त्याने एकट्याने हा वाहन हल्ला चढवला. गेल्या दोन वर्षांत जगभरामध्ये अशा प्रकारचे एकांडे वाहन हल्ले अनेक ठिकाणी चढवले गेल्याचे आपल्याला दिसेल. जर्मनीतील बर्लीनपासून फ्रान्समधील नीसपर्यंत आणि स्वतंत्र कॅटेलोनियातील बार्सिलोनापासून इंग्लंडची राजधानी लंडनपर्यंत अनेक शहरांमध्ये आजवर अशा प्रकारचे ‘लोन वूल्फ’ हल्ले आजवर चढवले गेले आहेत. अशा हल्ल्यांतून फार मोठी प्राणहानी जरी होत नसली, तरीही कधीही, कोठेही अशा प्रकारचा हल्ला चढवला जाऊ शकत असल्याने आणि तो रोखणे जवळजवळ दुरापास्त असल्याने अशा हल्ल्यांविषयी साहजिकच भीतीचे वातावरण अवघ्या जगात निर्माण झालेले आहे. आयसिसचा भर अलीकडे अशा प्रकारच्या एकांड्या हल्ल्यांवरच अधिक दिसतो, कारण सुसंघटितरीत्या हल्ले चढवण्याचे मनसुबे तडीस नेणे त्यांना सध्या जगभरात घेतल्या जाणार्‍या दक्षतेमुळे शक्य होत नाही. त्यामुळे जगभरातील आपल्या समर्थकांनी अशा प्रकारचे एकांडे हल्ले चढवावेत असे आवाहन आयसिसने तीन वर्षांपूर्वी केले होते. त्यातून अशा हल्ल्यांचे पेव फुटले आहे. इंग्लंडच्या राजधानीत लंडनमध्ये यावर्षी अशा प्रकारचे दोन वाहन हल्ले झाले. मार्चमध्ये वेस्टमिन्स्टरच्या राजवाड्याजवळ पुलावरील पदपथावर वाहन चढवले गेले, तर गेल्या जूनमध्ये लंडनच्या सुप्रसिद्ध लंडन ब्रीजवर त्याची पुनरुक्ती झाली. आता अमेरिकेची राजधानी न्यूयॉर्कच्या अत्यंत महत्त्वाच्या भागामध्ये हा हल्ला चढवला गेला आहे. मॅनहॅटन हा न्यूयॉर्कचा सर्वांत महत्त्वाचा भाग गणला जातो. न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंज आणि नासडॅक हे जगातील सर्वांत मोठे शेअरबाजार तेथे आहेत. सुप्रसिद्ध वॉल स्ट्रीट आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय आहे. मॅनहॅटनमधल्याच विश्व व्यापार केंद्रावर जगातील सर्वांत भीषण दहशतवादी हल्ला झाला होता. म्हणजेच अमेरिकेच्या राजधानीतील सर्वांत गजबजलेल्या भागामध्ये हल्ला चढवून त्या देशाचे नाक कापण्याचा प्रयत्न या हल्लेखोराने केला आहे. लंडनमधील हल्ल्यांची ठिकाणेही अशीच विचारपूर्वक निवडली गेल्याचे दिसेल. वरवर पाहता हे हल्ले ‘लोन वूल्फ’ प्रकारचे म्हणजे एकट्यानेच रचलेले जरी दिसत असले आणि त्यांचा एकमेकांशी तसा अर्थाअर्थी संबंध जरी नसला, तरी त्याच्या नियोजनामध्ये साधर्म्य दिसते. शहरातील सर्वांत प्रमुख भागामध्ये दहशत पसरवण्याचा इरादा आणि त्यासाठी वापरलेले तंत्र यामध्ये हे साधर्म्य आहे. एकीकडे अमेरिका इराक आणि सिरियामधून आयसिसचे उच्चाटन करण्यासाठी पुढे सरसावलेली आहे आणि तिच्या मोहिमेला यशही येताना दिसत आहे. त्याचा सूड उगवण्यासाठी हा हल्ला झालेला असावा यात शंका नाही. मोसूल आणि राक्का शहरांमधून आयसिसला माघार घ्यावी लागली आहे आणि येणार्‍या काळात त्यांच्या ताब्यातील उरलासुरला भूभागही परत मिळवण्यात अमेरिकी आणि रशियन सैन्यांना यश मिळण्याची चिन्हे आहेत. परंतु त्यानंतर पुढे काय हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे. स्थानिक पातळीवर त्या प्रदेशावर खंबीरपणे राज्य करू शकेल अशी शक्ती तेथे उभी राहिलेली नाही. जे अमेरिकेच्या वा रशियाच्या पाठिंब्यावर लढत आहेत, त्यांच्यामध्येच बेबनाव आहे. त्यामुळे या दोन्ही महासत्तांनी माघार घेतल्यानंतर ते आपसात लढणार नाहीत याची काहीही शाश्‍वती नाही. त्याचाच फायदा घेत आयसिस तेथे पुनरागमन करू शकते अशी भीती तज्ज्ञांना वाटते आणि ती अनाठायी नाही. पण एखाद्या प्रदेशावर आयसिसची सत्ता असणे हे जेवढे घातक आहे, त्याहून जगभरामध्ये त्याचे समर्थक निपजणे हे अधिक घातक आहे. अशा प्रकारच्या एकांड्या हल्ल्यांमधून अशा समर्थकांचे अस्तित्व अधूनमधून दिसत राहिले आहे. ही विषारी फळे हुडकणे फार अवघड आहे. अमेरिकेने नुकतीच विदेशी नागरिकांसाठी कडक सुरक्षा तपासणी लागू केली आहे. परंतु तो उपाय ठरू शकत नाही. खुद्द अमेरिकी नागरिकत्व असलेल्यांमध्येही अशा प्रकारचे माथेफिरू नसतील असे सांगता येत नाही. अशा एकांड्या हल्ल्यांचा भारतालाही धोका आहे आणि गोव्यासारख्या विदेशी पर्यटकांची वर्दळ असलेल्या राज्याला तर अधिकच आहे. हे अशा प्रकारचे अकल्पित, आकस्मिक संभाव्य हल्ले कसे आपण कसे रोखणार आहोत? त्यासंबंधी आपल्याकडे काय सुरक्षात्मक उपाययोजना आहेत? या प्रश्नांची उत्तरे आपणही शोधण्याची गरज आहे.