पुढील वर्षी डिसेंबरपर्यंत नवा झुवारी पूल खुला

0
242

नवा झुवारी पूल हा आठपदरी असून पहिले ४ पदरी मार्ग डिसेंबर २०१९ पर्यंत कोणत्याही परिस्थितीत वाहतुकीसाठी खुले करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी काल सांगितले. सर्व आठपदरी मार्ग २०२१ पर्यंत वाहतुकीसाठी खुले होणार असल्याचे ते म्हणाले.

गालजीबाग, तळपण, खांडेपार, मांडवी आदी सर्व पूल डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण होऊन वाहतुकीसाठी खुले होणार असल्याची माहितीही ढवळीकर यांनी यावेळी दिली. बोरी येथे नवा चारपदरी पूल उभारण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

जुना झुवारी पूल आम्ही यापूर्वी पाण्याच्या वाहिन्या व केबल नेण्यासाठी वापरण्याचा निर्णय घेतला होता. पण आता आम्ही या पुलाच्या जुन्या कमानी पाडून खांबांवर नव्या कमानी उभारून पूल हलक्या वाहनांसाठी उपलब्ध करून देण्याचा विचार करीत आहोत. कारण ‘कॅन्टी लिव्हर’ तंत्रज्ञानाचा वापर करून उभारण्यात आलेल्या अशाच एका पुलावर जुन्या कमानी पाडून नव्या कमानी उभारण्याचा निर्णय बिहारमध्ये घेण्यात आला आहे. तो पूल पाहण्यासाठी अभियंत्यांबरोबर आपण जाणार असल्याचे ढवळीकर यांनी सांगितले. तो पाहिल्यानंतर त्याबाबतचा निर्णय होणार असल्याचे ते म्हणाले.

कॅन्टी लिव्हर हे तंत्रज्ञान आता जुने झालेले असून त्या तंत्रज्ञानाचा वापर करून आता पूल उभारण्यात येत नसल्याचे ते म्हणाले. पणजीत कोसळलेला मांडवी पूल हेच तंत्रज्ञान वापरून बांधण्यात आला होता. पण कॉंग्रेस सरकारने देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने तो कोसळला. मात्र, भाजप सरकारने देखभाल व दुरुस्ती केल्याने झुवारी पूल अद्याप टिकून असल्याचे ढवळीकर म्हणाले.