पुढील वर्षापासून गोवा विद्यापीठात नवीन शैक्षणिक धोरण

0
14

>> कुलपती पी. एस. श्रीधरन पिल्लई यांची माहिती; गोवा विद्यापीठाचा ३३ वा पदवी प्रदान सोहळा संपन्न

केंद्र सरकारचे नवीन शैक्षणिक धोरण (एनईपी) २०२० एक ऐतिहासिक पाऊल असून, तो नवभारत आणि आत्मनिर्भर भारताचा पाया आहे. नवीन शैक्षणिक धोरणामुळे मुलांमध्ये नवीन कौशल्य, ज्ञान व क्षमता निर्माण होण्यास मदत होणार आहे. तसेच, विद्यार्थी आगामी काळातील आव्हाने पेलण्यासाठी आत्मनिर्भर होणार आहेत. गोवा विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक पाऊल उचलले आहे, असे प्रतिपादन राज्यपाल तथा गोवा विद्यापीठाचे कुलपती पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी केले. दोनापावल येथील राजभवनातील दरबार सभागृहात आयोजित गोवा विद्यापीठाच्या ३३ व्या पदवी प्रदान सोहळ्यात ते बोलत होते.

या सोहळ्यास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, गोवा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. हरिलाल मेनन, शिक्षण सचिव रवी दिवाण, आमदार गणेश गावकर यांची उपस्थिती होती.

गोवा विद्यापीठाच्या विविध शाखांची एकूण दहा शाखांमध्ये विभागणी केली जाणार आहे. तसेच, आणखी तीन शाखा सुरू करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे, असेही पिल्लई यांनी सांगितले.
दोन वर्षांच्या अंतरानंतर आयोजित ३३ व्या पदवी प्रदान समारंभात ११,०२८ पदवीधरांना पदवी, १५४६ पदव्युत्तर पदवीधरांना पदव्युत्तर पदवी आणि ६७ डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. याशिवाय १४९ जणांनी पदव्युत्तर पदविका प्राप्त केल्या. ७१ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके, ७३ विद्यार्थ्यांना बक्षिसे आणि गुणवत्तेची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.

भारत सरकारच्या ‘उन्नत भारत अभियान’ अंतर्गत गोवा विद्यापीठाने उत्तर गोव्यातील तीन गावे आणि दक्षिण गोव्यातील दोन गावे दत्तक घेतली आहेत आणि या भागातील रहिवाशांना लाभ मिळवून देणारे सागरी शेती यासारखे उपक्रम करत आहेत, असेही प्रा. हरिलाल मेनन यांनी सांगितले.

गोवा विद्यापीठाला कोची आणि मंगळूर येेथे कोकणी शिक्षणासाठी केंद्रे स्थापण्याची सूचना करण्यात आली आहे. ही केंद्र स्थापन करण्यास काही कायदेशीर अडथळे आहे. सरकारला त्याचे निराकरण करण्यासाठी सूचना करण्यात आली आहे, असेही पिल्लई यांनी सांगितले.