पुढच्या आठवड्यातही राज्यात उष्णतेचा पारा चढाच

0
8

>> हवामान खात्याचा अंदाज

>> काही राज्यांत उष्णतेची लाट

गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यात उष्णतेचा पारा चढलेला असून आणखी आठवडाभर गोमंतकीयांना वाढत्या उष्णतेच्या समस्येला तोंड द्यावे लागणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. काल राज्यात कमाल तापमान हे 33 ते 35 अंश सेल्सियस एवढे होते, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

सध्या उत्तर भारतापासून दक्षिण भारतापर्यंत सर्वच ठिकाणी उष्णतेने कहर केलेला आहे. वाढते तापमान व कडक उन्हामुळे नागरिक हैराण झालेले आहेत. विशेष करून ज्येष्ठ नागरिकांना या उष्णतेमुळे बाहेर ऊन्हातून फिरताना खूपच त्रास होत असल्याच्या तक्रारी आहेत. उष्म्यामुळे शरीरातून घामाच्या धारा वाहत असल्याच्या व शरीराची लाही लाही होत असल्याच्या वाढत्या तक्रारी आहेत.
दरम्यान, सोमवारी सकाळी राज्यात पावसासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. आकाशात ढग दाटून आल्याने पावसाच्या सरी कोसळतील की काय अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र, पावसाने हूल दिल्याने नंतर दुपारपर्यंत तापमानाचा पारा बराच चढला. सध्या उष्णतेमुळे दुपारच्यावेळी बाहेर जाणे शक्य तो लोक टाळत असल्याचे पहावयास मिळत आहे. तर थंड पेयांची तसेच कलिंगडची मागणी वाढली आहे.

देशात उष्णतेचा प्रभाव

देशात तीव्र उष्णतेचा प्रभाव कायम आहे. हवामान खात्याने उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे. या राज्यांमध्ये 3 दिवसांनी उष्णतेची तीव्र लाट येईल असा इशाराही खात्याने दिला आहे.

उष्णतेच्या लाटेचा इशारा असलेल्या राज्यांमध्ये तापमान 42 अंशांपेक्षा जास्त नोंदवले गेले आहे. याशिवाय महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्येही 42 अंश तापमानाची नोंद झाली आहे. मात्र, या तीन राज्यांमध्ये उष्णतेची लाट नाही.