पीपीपी’ तत्त्वावर उत्तर व दक्षिण गोवा इस्पितळ सुसज्ज बनवणार

0
1

>> आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांची माहिती; डॉक्टरांच्या पथकाकडून योजनेवर काम सुरू

संपूर्ण राज्यभरातील लोकांना उपचारासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकॉ) यावे लागू नये यासाठी आता आरोग्य खात्याने ‘पीपीपी’ अर्थात सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर उत्तर व दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ, तसेच फोंडा येथील उपजिल्हा इस्पितळ सुसज्ज बनवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती काल आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. त्यासाठी नेमके काय काय करावे लागेल याची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आघाडीचे वैद्यकीयतज्ज्ञ डॉ. सुनील बडिगर यांच्यासह अन्य तिघांची मदत घेतल्याची माहिती देखील त्यांनी दिली.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत नुकत्याच मांडलेल्या अर्थसंकल्पामुळे गोव्याच्या आरोग्य खात्याला कोणते लाभ मिळू शकणार आहेत याविषयी सांगताना त्यांनी वरील माहिती दिली.

पीपीपी तत्त्वावर उत्तर गोवा व दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळे सुसज्ज बनवण्याची योजना असून, त्यासाठी चार तज्ज्ञ डॉक्टरांची मदत घेण्यात आलेली असून, गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून सुनील बडिगर यांच्यासह चार डॉक्टरांच्या पथकाने त्यासंबंधीची योजना तयार करण्याचे काम हाती घेतले असल्याचे राणे म्हणाले. गोव्यात वैद्यकीय शिक्षण घेऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन राज्यात आणखी 100 जागा वाढवण्यात याव्यात अशी मागणी आम्ही भारतीय वैद्यकीय मंडळाकडे केली असून त्यासाठी राज्यात आणखी एक सरकारी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याबाबत विचार करावा, अशी त्यांना सूचना केली असल्याचे राणेंनी सांगितले.

गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळाचा झपाट्याने विकास होऊ लागलेला असून तेथील संकुलात सुपर स्पेशालिटी इस्पितळ यापूर्वीच उभे राहिलेेले आहे. डिसेंबर 2026 पर्यंत कर्करोग इस्पितळ उभे राहणार असल्याची माहिती राणे यांनी दिली.