मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पर्वरी येथे मंत्रालयात घेतलेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत पीएम गती शक्ती गोवा मास्टर प्लॅनचा आढावा काल घेतला. गती शक्ती गटाने गोव्यासाठी गती शक्ती मास्टरप्लॅन सादर केला आहे. या बैठकीत वेर्णा औद्योगिक वसाहतीचा तिसरा टप्पा, संजीवनी सहकारी साखर कारखान्याचा पुनर्विकास, धारबांदोडा येथील ट्रक टर्मिनस, दोनापावल येथील आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर, बाणावली येथील फिश हॅचरीचा पुनर्विकास या प्रकल्पांच्या प्रगतीबाबत चर्चा करण्यात आली, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. रस्ते, रेल्वे, बंदरे, जलमार्ग, विमानतळ, लॉजिस्टिक आणि इन्फ्रास्ट्रक्चर आणि भारतमाला, सागरमाला, अंतर्देशीय जलमार्ग, बंदरे यांचा समावेश असलेल्या मास्टरप्लॅनच्या अंमलबजावणीच्या विविध पैलूंबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली, अशी माहिती त्यांनी दिली.