पिसुर्लेतील कॅटामाईन ड्रग्ज प्रकरणाची सखोल चौकशी करा

0
166

>> कॉंग्रेस शिष्टमंडळाची पोलीस महासंचालकांकडे मागणी

>> वाढत्या ड्रग्ज व्यवहारांबद्दल चिंता

कॉंग्रेस पक्षाच्या एका शिष्टमंडळाने पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर यांची पोलीस मुख्यालयात भेट घेऊन पिसुर्ले औद्योगिक वसाहतीतील एका आस्थापनांतून जप्त करण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कॅटामाईन अमली पदार्थ प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी काल केली आहे.

कॉंग्रेसच्या शिष्टमंडळामध्ये आमदार आलेक्स रेजिनाल्ड, आमदार नीळकंठ हळर्णकर व इतरांचा समावेश होता. कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्यातील वाढत्या अमली पदार्थांच्या व्यवहाराबाबत चिंता व्यक्त केली. पोलिसांनी अमली पदार्थांच्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

पिसुर्ले औद्योगिक वसाहतीमधील भाजपच्या एका स्थानिक नेत्याच्या आस्थापनांतून दिल्लीतील महसूल दक्षता संचालनालयाने शंभर किलो कॅटामाईन हे बंदी असलेले अमली पदार्थ जप्त केले आहे. लोखंडी ग्रील्स तयार करण्यात येणार्‍या आस्थापनाचा अमलीपदार्थ तयार करण्यासाठी वापर केला जात होता, असा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी कसून चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे तसेच राज्यातील विविध भागात अमली पदार्थांच्या विक्रीचे प्रकार उघडकीस येत आहेत. याप्रकरणी कडक कारवाई करावी, अशी मागणी कॉंग्रेस पक्षाने केली.

पिसुर्ले येथे ताब्यात घेण्यात आलेल्या कॅटामाईन अमली पदार्थ जप्तीबाबत सध्या पोलिसांकडे कोणतीही माहिती उपलब्ध नाही. या प्रकरणासंबंधी आवश्यक माहिती मिळवून योग्य कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन पोलीस महासंचालक चंदर यांनी शिष्टमंडळाला दिले.

देशभरात ३०८ किलो
कॅटामाईन छाप्यांत जप्त
केंद्रीय महसूल दक्षता संचालनालयाने देशभरात विविध ठिकाणी छापे घालून ३०८ किलो कॅटामाईन अमलीपदार्थ जप्त केले. त्यात पिसुर्ले येथील एका आस्थापनांतून जप्त केलेल्या कॅटामाईन अमलीपदार्थाचा समावेश आहे. या प्रकरणी तीन विदेशी नागरिकांसह दहा जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. डीआरएने खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गोव्यासह महाराष्ट्र व इतर काही ठिकाणी छापे घालून बंदी असलेले कॅटामाईन अमलीपदार्थ जप्त केले आहे. अमली पदार्थांचा व्यवहार करणारे आंतरराष्ट्रीय रॅकेट उघडकीस आणले आहे.