पावसाळी रानफुलांचे सौंदर्य

0
1469

– राजेंद्र पां. केरकर

गोव्यातल्या सह्याद्रीचे दर्शन वर्षाच्या बारा महिन्यात प्रत्येक ऋतूत आपल्याला प्रसन्नता देत असले तरीदेखील इथल्या वृक्षवेलींचा, तृणपात्यांचा खराखुरा बहर अनुभवायचा असेल तर पाऊस त्यांचा संजीवकच आणि त्यामुळे या मौसमात असंख्य रानफुलांचे रंगगंध मानवी जगण्यातले ताणतणाव नाहीसे करण्यात महत्त्वाचे योगदान देतात.

पश्चिम घाटात वसलेल्या गोव्याच्या डोंगरदर्‍यांत एकदा मान्सूनी पावसाळ्याचे आगमन झाले की हा हा म्हणता विलक्षण रीतीने तेथे परिवर्तन उद्भवते. ग्रीष्माच्या रखरखाटात इतके दिवस निस्तेज, मलूल असलेल्या वृक्षवेलींचे रूप हिरवाईच्या लावण्यात आगळ्यावेगळ्या रूपात विलसू लागते. मृतवत् झालेली तृणपाती धरित्रीच्या कणाकणांतून आपल्या अस्तित्वाच्या खाणाखुणा हिरवाईद्वारे देऊ लागतात. पाऊस हा धरित्रीचा सखा याची प्रचिती, तिच्या अंगोपांगी या दिवसात वास करणार्‍या वृक्षवेलींच्या लावण्याद्वारे येते. गोव्यातल्या सागरकिनार्‍यांच्या सौंदर्यावरती मोहीत होऊन लाखो पर्यटक देशविदेशांतून येथे येतात. त्यातल्या बर्‍याच जणांना गोव्याला पश्चिम घाटातल्या जंगलाच्या वैभवाची पार्श्‍वभूमी लाभलेली आहे याची अभावानेच जाणीव असते. पावसाळ्याचे थेंब प्राशन करणार्‍या धरित्रीची तृप्ती वृक्षवेली, तृणपाती, झुडपे यांच्यावरती उमलणार्‍या मोहक आणि नाजूक रानफुलांद्वारे कळते. मान्सूनपूर्व पावसाची शिरशिर जेव्हा लागते तेव्हाच माडत, किंदळ, आंबा, फणसासारख्या स्वदेशी वृक्षांच्या फांद्याफांद्यावर कोणाच्या सहसा लक्षात न येणारी आमरी मान्सूनच्या पावसाचे जणुकाही हार्दिक स्वागत करण्यासाठी निळसर, जांभळ्या, गुलाबी रंगांची छटा मिरवणार्‍या गजर्‍यांसारखा उत्स्फूर्त आविष्कार घडवतात. आमरी ही वनस्पती बारमाही जगणारी. परंतु तिचे अस्तित्व पावसाळा वगळता अन्य मौसमात कोणाच्या लक्षात भरत नाही. आमरीची निसर्गदत्त गजर्‍यांच्या रूपात फुलणारी छोटेखानी फुले सीतेची वेणी, द्रौपदीची वेणी आदी नावांनी लोकमानसात अजरामर झालेली आहेत.
सीतेची वेणी, द्रौपदीची वेणी या आमरीच्या प्रजाती मान्सूनच्या पावसाळ्याला वर्दी देण्यासाठी जणुकाही फुलतात असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. हिवाळ्यात, उन्हाळ्यात आमरीच्या काही प्रजाती फुलतात. परंतु सीतेची वेणी आणि द्रौपदीची वेणी यांची मोहकता तनामनाला प्रसन्न करणारी अशीच असते. आमरीची वनस्पती आपल्यातल्या सौंदर्याचा उत्स्फूर्त आविष्कार लांबलचक गजर्‍याद्वारे घडवते! हवेत गारवा असेल तर आमरीची गजर्‍यात फुललेली फुले एक-दोन आठवडे झाडावरची लोंबकळत असलेली दृष्टीस पडतात. आमरीच्या सीतेची वेणी, द्रौपदीची वेणी या प्रजातींशिवाय आषाढ-श्रावणात असंख्य वृक्षवेली, झुडपांवरती रानफुलांचे मौसमी सौंदर्य निसर्गप्रेमींबरोबर संवेदनक्षम व्यक्तीचे लक्ष वेधून घेते.
ग्रीष्म ऋतूच्या उत्तरार्धात नागलकुड्याच्या झुडपावरती पांढर्‍या शुभ्र मोगरीसारख्या रंगरूपांचा आविष्कार दृष्टीस पडतो. या फुलांचे गरजे पूर्वीच्या काळी आदिवासी जमातीच्या वेळिप महिला आपल्या केसात माळायच्या. परंतु आज या रानटी फुलांचे समाजाला विस्मरण झाल्याने, त्यांचा बहर निसर्गात होतो. नागलकुड्याच्या फुलांचा हा बहर पावसाळ्यातही काही काळ तग धरून राहतो आणि प्रसन्नतेचा शिडकावा करत राहतो. अंजनी वनस्पती झुडपाच्या रूपात असते. तिच्या पोपटी-हिरव्या पानांनी युक्त फांद्यांच्या आत गुच्छाने निळसर, जांभळ्या, गुलाबी, पांढर्‍या रंगांची फुले लक्षवेधक असतात. पावसाचे टपोरे थेंब धारण करून, या फुलांचा बहर आणखीच सुंदर भासतो. आईन म्हणजे माडतीचे झाड. गोव्यात हे झाड राजवृक्ष असून, पावसाळ्यात या झाडावरती प्रारंभी मंजिरीच्या रूपातली फुले विलसू लागतात. काही दिवसांनी त्यांचे रूपांतर माहुल्लात होते. भाद्रपद चतुर्थीला गणपतीच्या माथ्यावरती जी माटोळी बांधली जाते त्यात आईनाची तांबूस, पोपटी छटा असलेली फुले न चुकता बांधली जातात. खरखरीत पानांनी नटलेल्या सागवानी वृक्षावरती पावसात गुच्छाने पोपटी पिवळसर रंगाची असंख्य फुले विराजमान होतात. सूक्ष्म, सुकोमल असलेली ही फुले गुच्छाद्वारे पावसाच्या लावण्यात भर घालतात.
कदंब वृक्षाचे नाते भगवान श्रीकृष्णाशी जोडलेले असून, गोपगवळणींबरोबर क्रीडा करतात त्याचा उल्लेख प्रामुख्याने आढळतो. या कदंब वृक्षाला ग्रीष्मातील छोट्या चेंडूच्या आकाराची पिवळसर पांढरी छटा असलेली फुले मोठ्या प्रमाणात येतात. हा बहर पावसाळ्यात विशेष खुलतो आणि पर्जन्यधारांबरोबर या फुलांची पखरण वृक्षातळाचा परिसर सुगंधित करते. कदंबाच्या मोठ्या फुलाच्या तुलनेत कळमवृक्षाची फुले छोटेखानी. पोपटी रंगाच्या पानांत पांढरी पिवळी छटा असलेली ही फुले खूपच सुंदर दिसतात. घायटी वनस्पतीचे झुडूप जास्वंदी फुलासारख्या छोट्या देठांनी लांबट तांबूस फुलांनी पावसात बहरते. कोश्ट हे लांबट हिरव्या पानाचे झुडूप तांबूस बोंडात पांढर्‍या शुभ्र फुलांचा बहर पावसातच धारण करते. वनौषधी आणि रानटी भाजी म्हणून उपयुक्त असणारे हे झुडूप शुभ्र फुलांनी युक्त असते. भारंगीचे छोटे झुडूप पाऊस कोसळू लागल्यावरती नवीन तजेला धारण करते आणि अल्पावधीत या झुडपाच्या माथ्यावरती पांढरी, जांभळी फुले घेऊन विलसते.
कटुर्लाचा वेल पावसाळ्यात वाढताना विस्तारत जातो आणि त्याच्या छोट्या वेलावरती लक्षवेधक पिवळ्या रंगाच्या फुलांचे वैभव दृष्टीस पडते. रानदोडगी, रानकाकडीचे वेलही पिवळ्या धमक फुलांचे सौंदर्य मिरवू लागतात. शेरवड वनस्पतीचा वेल त्याच्या पांढर्‍या रंगाच्या पानांमुळे सहजपणे लक्षात येतो. या वेलीवरती पाच पाकळ्यांचे तार्‍यागत अगदी छोटे फूल हिरव्या पर्णसंभारात दृष्टीस पडते आणि त्यासाठी श्रावणातले आदित्य पूजन, मंगळागौर, नागपंचमीत या शेरवडाच्या पानाफुलांचा वापर हमखास केला जातो. रानकोरांटीची जांभळी, निळी फुले पावसाळ्यातल्या गारव्याचा लाभ घेत फुलतात. औषधी गुणधर्माने युक्त अडुळसा आणि काटे अडुळसाची झुडपे छोटेखानी पांढर्‍या फुलांनी डवरतात. पावसाची रिमझिम जेव्हा थांबते तेव्हा रक्तवर्णी आणि पिवळसर छटा असलेल्या वाकेरीच्या वेलीवरती लांबलचक फुलाचा तुरा येतो, त्यात मधुर मध असल्याने टोकदार चोचीचे पक्षी त्याच्यावरती विलसू लागतात. गायरी, कोंडानी, गावेल या वनस्पतीच्या वेलांनी पावसाळ्यात जणुकाही ऊर्जाच लाभते आणि त्यामुळे हे वेल गुलाबी-जांभळसर छटा असलेल्या फुलांनी बहरतात. मूळ आफ्रिकेतल्या झिम्बाब्वे देशातले राष्ट्रीय फूल म्हणून ओळखली जाणारी कळलावीची वेल पावसाच्या मौसमात भगव्या-पिवळ्या रंगांच्या फुलांनी डवरते. या फुलांचा रंग आणि अग्नीची ज्वाळा यांच्यात साम्य असल्याने संस्कृत भाषेत हे रानफूल अग्नीशिखा म्हणून प्रसिद्धीस पावलेले आहे.
भेंद्री, हळुंदा हे रानटी वेल श्रावणात जांभळसर, गुलाबी रंगाच्या फुलांचे सौंदर्य प्रदर्शित करतात. त्याचे रूप सुंदर पाकळ्यांमुळे नजरेत भरण्यासारखे असते. दुधवेल, नावळी, पिवळी पुंगलीसारखे वेल पावसाळी मौसमात आपल्या फुलांचा आविष्कार घडवतात. अळूची वनस्पती जरी बारमाही आपल्या दृष्टीस पडत असली तरी तिच्या सापाच्या फण्यासारखे पिवळे धमक लांबलचक फूल आषाढ-श्रावणात फुलते. गोव्यातल्या सह्याद्रीचे दर्शन वर्षाच्या बारा महिन्यात प्रत्येक ऋतूत आपल्याला प्रसन्नता देत असले तरीदेखील इथल्या वृक्षवेलींचा, तृणपात्यांचा खराखुरा बहर अनुभवायचा असेल तर पाऊस त्यांचा संजीवकच आणि त्यामुळे या मौसमात असंख्य रानफुलांचे रंगगंध मानवी जगण्यातले ताणतणाव नाहीसे करण्यात महत्त्वाचे योगदान देतात.