पावसामुळे राज्यात आज रेड अलर्ट

0
149

>> जोरदार पावसाची शक्यता, पेडण्यात इंचांचे शतक

>> आतापर्यंत ६९.९३ इंच पाऊस

राज्याला काल रविवारी जोरदार पावसाने झोडपून काढले. आज सोमवार १९ जुलै रोजी जोरदार पावसाची शक्यता वर्तविली असून सोमवार १९ जुलै हा दिवस रेड अलर्ट म्हणून हवामान विभागाने घोषित केला आहे. राज्यात पुढील आठवड्यात पावसाचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. राज्यात आतापर्यंत ६९.९३ इंच पावसाची नोंद झाली आहे. यंदा पाऊस सरासरीपेक्षा १७ टक्के जास्त आहे.
राज्यातील पेडणे तालुक्याने पावसाच्या इंचांचे शतक पूर्ण करण्याचा मान पटकाविला आहे. पेडणे येथे आतापर्यंत १००.७ इंच पावसाची नोंद झाली आहे. पेडण्यात मागील चोवीस तासांत २.७७ इंच पावसाची नोंद झाली आहे.
पेडण्यात संततधार पाऊस
संततधार पावसामुळे पेडणे तालुक्यात ठिकठिकाणी झाडे तसेच वीज खांब उन्मळून पडले आहेत. त्यामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली. तसेच अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे. येथील महामार्गावरील अवजड वाहतूकही काही काळ बंद होती.
वास्कोत रस्ते पाण्याखाली
शनिवारी रात्री व काल रविवारी सकाळपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण वास्को शहराला झोडपून काढले. अविरत पडलेल्या पावसामुळे शहरातील तसेच इतर ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेले होते. काही ठिकाणी दुकानात पाणी शिरले होते. रस्त्यावर पार्क करून ठेवलेल्या चारचाकी वहाने, दुचाक्या पाण्याखाली गेल्या होत्या. वास्कोतील स्वातंत्र्य पथ, एफएल गोम्स हे रस्ते तसेच इतर रस्त्यांवरून पाणी वहात होते.
डिचोलीत मुसळधार
डिचोली तालुक्याला शनिवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले. डिचोली, वाळवंटी पार या नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे. अंजुणे धरण परिसरात ६६ मी. मी. पावसाची नोंद झाली असून धरण ८६ मीटरपर्यंत भरले आहे. तिलारी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.
मडगावात जनजीवन विस्कळीत
मडगाव शहरात मुसळधार पाऊस कोसळत असून, शनिवारी रात्री ते रविवार संपूर्ण दिवसभर निरंतर पावसाच्या सरी कोसळल्या. परिणामी शहरातील जनजीवन विस्कळीत झाले.

पेडण्यात पावसाची शंभरी
राज्यात आतापर्यंत नोंद झालेला पाऊस – म्हापसा येथे ७५.६० इंच, पेडणे येथे १००.७ इंच, फोंडा ६०.४३ इंच, पणजी येथे ६९.०३ इंच, ओल्ड गोवा येथे ६९.२२ इंच, साखळी येथे ६८.०४ इंच, वाळपई येथे ७०.३९ इंच, काणकोण येथे ६१.६३ इंच, दाबोली येथे ६०.०८ इंच, मडगाव येथे ५६.५४ इंच, मुरगाव येथे ५८.४४ इंच, केपे येथे ७७.०५ इंच आणि सांगे येथे ७०.६१ इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यात सकाळी ८.३० ते संध्याकाळी ५.३० या काळात मुरगाव येथे ५.८२ इंच, जुने गोवे ५.४५ इंच, पणजी ४.४५ इंच, काणकोणात ३.३० इंच तर पेडण्यात २.७७ इंच पावसाची नोंद झाली.

मुंबईत पावसामुळे २७ जणांचा मृत्यू

मुंबईत झालेल्या धुवांधार पावसामुळे काल एकूण २७ जणांचा मृत्यू झाला आहे. चेंबूर परिसरात २१ आणि विक्रोळीत ५ जणांचा मृत्यू झाला आहे. चेंबूर अपघातात १६ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले असून तिथे पाच घरे कोसळली. त्यामुळे मोठी हानी झाली आहे. चेंबूरमध्ये भागात घरांची भिंत कोसळल्याने १७ जणांचा मृत्यू झाला. यात दोन जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार केल्यानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले. विक्रोळीतील कोसळलेल्या इमारतीच्या ढिगार्‍यातून ६ मृतदेह सापडले आहेत. यामध्ये आणखी ५-६ लोक अडकल्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.

चेंबूरमध्ये भिंत कोसळलेल्या भागात अरुंद गल्ली असल्यामुळे बचाव करणे कठीण जात आहे. सध्या मदत आणि बचावकार्य सुरू आहे. स्थानिक लोकांचीही मदत यात घेण्यात येत आहे. शनिवारी रात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. काही लहान मुलेही ढिगार्‍याखाली अडकली आहेत.

पंतप्रधानांकडून मदत
या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच मोदी यांनी मदतीची घोषणा केली आहे. मृत पावलेल्यांच्या नातेवाईकांना २ लाखांची तर जखमी झालेल्यांना ५० हजार रुपये मदत जाहीर केली आहे.