पावसाची राज्यात विश्रांती

0
20

>> २४ तासांत किरकोळ पाऊस, आतापर्यंत ७८.३२ इंचांची नोंद

राज्यात मागील सात दिवसात पावसाने उसंत घेतली आहे. चोवीस तासात ०.३१ इंच अशा किरकोळ पावसाची नोंद झाली आहे. राज्यात आत्तापर्यंत ७८.३२ इंच पावसाची नोंद झाली असून पावसाचे प्रमाण आत्तापर्यंत १४.६ टक्के जास्त आहे.

राज्याला जुलै महिन्याच्या सुरुवातीच्या पंधरा दिवसांत जोरदार पावसाने झोडपून काढले. राज्यातील अनेक भागांत जोरदार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. तथापि, मागील सात दिवसात पावसाने उसंत घेतल्याने नागरिकांनी सुस्कारा सोडला आहे.

राज्यात आगामी चार दिवसात जोरदार पावसाची शक्यता नाही, असे हवामान विभागाने जाहीर केले आहे. चोवीस तासांत पेडणे येथे सर्वाधिक ०.८१ इंच पावसाची नोंद झाली आहे. सांगे येथे ०.५७ इंच, केपे येथे ०.४८ इंच, साखळी आणि मडगाव येथे ०.४० इंच पावसाची नोंद झाली आहे.

केपेत १०४ इंच पाऊस
राज्यात आतापर्यंत केपे येथे सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. केपे येथे पावसाने इंचाचे शतक ओलांडले असून तेथे १०४.८५ इंच पावसाची नोंद झाली आहे. पेडणे येथे ८८.५९ इंच आणि सांगे येथे ८६.०९ इंच, काणकोण येथे ८४.६५ इंच पावसाची नोंद झाली आहे.
धरणांच्या पातळीत वाढ
राज्यातील प्रमुख धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. साळावली धरण भरून वाहू लागले आहे. तिळारी धरण ८१ टक्के, अंजुणे धरण ६९ टक्के भरले आहे. चापोली, आमठणे, पंचवाडी, गवाणे ही धरणे भरली आहेत.