पालिका निवडणुकीची आज घोषणा होण्याची शक्यता

0
94

राज्य निवडणूक आयोगाकडून राज्यातील ११ नगरपालिका आणि पणजी महानगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा सोमवारी केली जाण्याची शक्यता आहे.
राज्य निवडणूक आयोगाने सोमवार दि. २२ फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. यावेळी नगरपालिकांच्या निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.

राज्य निवडणूक आयोगाने नगरपालिका आणि पणजी महानगरपालिका निवडणुकीसाठी २० मार्च २०२१ ही तारीख निश्‍चित केली आहे. राज्यातील नगरपालिका निवडणुकीबरोबर जिल्हा पंचायत पोटनिवडणूक आणि ग्रामपंचायतींच्या काही प्रभागासाठी पोटनिवडणूक घेतली जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी निर्वाचन अधिकारी, निवडणूक निरीक्षक, खर्च निरीक्षक यांची नियुक्ती केलेली आहे.
राज्यातील नगरपालिकांतील आरक्षण आणि प्रभाग रचनेबाबत ९ याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवर २३ फेब्रुवारीला पुढील सुनावणी होणार आहे. त्यापूर्वीच नगरपालिकांच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.