पार्सेकरांनी मांडलेला अर्थसंकल्प महागाई वाढविणारा : कॉंग्रेस

0
130

मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी २०१५-१६ च्या आर्थिक वर्षासाठी मांडलेला अर्थसंकल्प हा गोव्याचा विकास साधणारा नसून महागाईत मात्र भरच घालणारा आहे, असा दावा काल कॉंग्रेस प्रवक्ते ऍड. यतीश नाईक यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.पेट्रोल व डिझेलवरील मूल्यवर्धित करात ५ टक्क्यांनी वाढ करण्यात आल्याने सामान्य लोकांना वरील इंधनासाठी अतिरिक्त पैसे तर मोजावे लागतीलच. शिवाय त्यांचे दर वाढल्याने अन्य सर्व जीवनावश्यक वस्तूंचे दरही वाढणार असल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले. राज्यातील युवक-युवतींसाठी रोजगार निर्मिती कशी केली जाईल हे सरकारने अर्थसंकल्पातून स्पष्ट केले नसल्याचेही ते म्हणाले. पार्सेकर यांनी विधानसभेत मांडलेला अर्थसंकल्प दिशाहिन असून गेल्या वर्षी तात्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी जो अर्थसंकल्प मांडला होता त्याच्याशी या अर्थंकल्पातून सलगपणा ठेवण्यास आला नसल्याचा दावाही नाईक यांनी यावेळी केला.
सरकारने वाहनचालकांना स्मार्ट ड्रायव्हिंग लायसन्स देण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठीच्या शुल्कात वाढ केली आहे. तसेच डुप्लिकेट वाहन कर पुस्तिकेसाठीचे शुल्क ५ रु. वरून १०० रु. वर नेले आहे. सामान्य लोकांना याचा फटका बसणार आहे, असे नाईक यांनी यावेळी स्पष्ट केले. सरकारने विहिरींजी नोंदणी सक्तीची केली असून त्यासाठी ५० रु. शुक्ल आकारण्यात येणार आहे. याचीही सामान्यांना झळ बसणार असल्याचे नाईक म्हणाले. गेल्या वर्षीच्या अंदाजपत्रकातून करण्यात आलेल्या काही घोषणांची अंलमबजावणी झालीच नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.