पायघड्या

0
85

पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करू द्यावे की नाही हा वाद पुन्हा एकदा उफाळला आहे. प्रत्येकवेळी पाकिस्तानने भारताची कुरापत काढली की, हा वाद ऐरणीवर येत असतो. बाजू घेतल्या जातात. अटीतटीने मांडल्या जातात. वातावरण निवळले की, पुन्हा जैसे थे व्यवहार सुरू होतात. उरी हल्ल्यानंतर देशभावना तीव्र बनली. जे पाकिस्तान भारतात सातत्याने दशकानुदशके दहशतवाद पेरत आले, त्या देशातील नागरिकांना आपल्या देशात लाल पायघड्या का अंथरल्या जात आहेत असा सवाल त्यामुळे पुन्हा एकवार विचारला गेला. राज ठाकरेसारख्यांनी या तापलेल्या तव्याची संधी हेरली आणि आपले राजकारण पुढे दामटले. या स्फोटक परिस्थितीत पाकिस्तानी कलाकारांची बाजू घेण्याचे धैर्य सलमान खानने दाखवले. तो म्हणतो तसे ते कलाकार रीतसर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आलेले असतात. तो व्हिसा त्यांना सरकारनेच दिलेला असतो. त्यांचा आणि दहशतवादाचा काही संबंधही नाही. पण… हा ‘पण’ ही तितकाच महत्त्वाचा आहे. आपल्या पाकिस्तान सरकारच्या भारतविरोधी भूमिकेबद्दल तेथील या कलाकार मंडळींनी कधी ‘ब्र’ तरी काढला आहे का? भारतामध्ये मृत्यूचे थैमान मांडलेल्या दहशतवाद्यांविरुद्ध बोलण्याची त्यांची हिंमत झाली आहे का? किमान ज्या भारतामध्ये आपण रोजीरोटीसाठी येतो, त्यावर आपल्याच देशबांधवांकडून होत असलेल्या हल्ल्याचा निषेध नोंदवण्याइतपत वा सहवेदना व्यक्त करण्याइतपत तरी बांधिलकी त्यांनी का दाखवू नये? केवळ व्यवसायानिमित्ताने भारतात यायचे, पैसा कमवायचा, बाकी भारताच्या सुखदुःखाशी काहीही देणेघेणे नाही, येथील जनतेचे, सैनिकांचे हकनाक बळी जात आहेत, त्याच्याशी काही सोयरसुतक नाही अशा प्रकारची ही निव्वळ व्यावसायिक वृत्ती जर असेल तर अशा मंडळींसाठी या तापलेल्या वातावरणात पायघड्या का अंथरल्या जाव्यात? किती भारतीय कलाकारांना आजवर पाकिस्तानमध्ये आमंत्रण दिले गेले आहे? कितींचा सन्मान झाला आहे? दोन्ही देशांमध्ये शांततामय वातावरण असेल, सौहार्दाचे, मैत्रिपूर्ण संबंध असतील तर हे आदानप्रदान अवश्य व्हावे; नव्हे ते झालेच पाहिजे; परंतु जेव्हा एकमेकांविरुद्ध बंदुका घेऊन उभय देश सीमेवर उभे आहेत, अशा वेळी जर गळाभेटी घेतल्या जाणार असतील, तर तो जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार ठरेल. दोन्ही देशांदरम्यान चांगले संबंध प्रस्थापित करण्याची जबाबदारी जशी सरकारची आहे, तशीच परस्परांशी संबंध येणार्‍या मंडळींचीही आहे. उभयपक्षी संवाद वाढलाच पाहिजे, परंतु वेळ आणि काळ विसरून नव्हे. आपला देश कोणत्या परिस्थितीतून जात आहे, त्याच्याशी आपला काहीच संबंध नसल्यागत कोणी वागणार असेल आणि केवळ व्यावसायिक हित पाहणार असेल तर ते गैर आहे. पाकिस्तानी कलाकारांबद्दल भारताने नेहमीच प्रेम बाळगले आहे, त्यांच्या कलेचा सन्मान केलेला आहे, परंतु जो भारत आपल्यावर, आपल्या गाण्यावर एवढे प्रेम करतो त्याच्या सुखदुःखाशी या मंडळींचे काहीच देणेघेणे नसावे? शेजार्‍याच्या घरी मेजवान्या झोडायला जायचे आणि त्याचे घर जळत असताना मात्र दडून बसायचे असाच प्रकार हे पाकिस्तानी कलावंत करतात म्हणून त्यांच्या प्रती आज नाराजी व्यक्त होते आहे हे त्यांनीही समजून घेतले पाहिजे. वैर आणि द्वेषाची भावना शेवटी कोणाच्याच हिताची नसते. परंतु एकमेकांच्या उरात सुरा खुपससेला असताना मैत्रीचे कढ येऊ शकत नाहीत हेही तितकेच खरे आहे. दोन्ही देशांतील ही तेढ कमी व्हावी, वैर मिटावे आणि मैत्रिपूर्ण संबंध प्रस्थापित व्हावेत यासाठी दोन्ही बाजूंनी प्रामाणिक प्रयत्नांची आज गरज आहे. सदोदित केवळ एकाच हाताने टाळी वाजू शकत नाही आणि टाळी वाजवण्याची जबाबदारी केवळ एका हाताचीही नाही!