पाणी, वीज नसलेल्या घरांची माहिती गोळा करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना

0
72

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यात पाणी, वीज जोडणी, स्वच्छतागृह नसलेल्या घरांची माहिती गोळा करण्याची सूचना अधिकार्‍यांना काल केली.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सरकारच्या विविध खात्याच्या अधिकार्‍यांची बैठक घेऊन आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा काल घेतला.
राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सरकारी अधिकार्‍यांनी ग्रामीण भागातील विविध समस्यांबाबत माहिती फेब्रुवारी महिन्यात गोळा करावी, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी बैठकीत बोलताना स्पष्ट केले.

पाणी जोडणी, पाण्याचा पुरवठा न होणार्‍या घरांची माहिती, वीज जोडणी, स्वच्छतागृह नसलेल्या घरांची माहिती गोळा करावी. तसेच घर नसलेल्या व्यक्तीबाबत माहिती गोळा करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी काल अधिकार्‍यांना केली.

विविध भागातील दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक यांचीही माहिती गोळा करावी. कृषी कार्ड नसलेल्या शेतकर्‍यांची माहिती, शेती, मच्छीमारी, पशुपालन यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबाची माहिती गोळा करण्याची सूचना केली आहे.

आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा या योजनेमध्ये नागरिकांचा जास्तीत जास्त सहभाग करून घेण्यावर भर देण्याची सूचना करण्यात आली. पंचायतींनी आर्थिक विकासासाठी विविध उपाययोजना हाती घेण्याची गरज आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. या बैठकीला मुख्य सचिव परिमल राय, पंचायत संचालक, तालुका नोडल अधिकारी आणि स्वयंपूर्ण मित्र यांची उपस्थिती होती.