पाणी… नव्हे जीवन…संजीवन!

0
208

 

  • प्रा. वर्षा नाईक

‘शुद्ध नैसर्गिक पाणी’ अशी गोष्ट आज अस्तित्वातच नाही. पावसाचे पाणी जे सर्वांत नैसर्गिक व शुद्ध समजले जाते त्यातसुद्धा काही विरघळलेले वायु असतात जसे ऑक्सीजन आणि कार्बन-डाय-ऑक्साईड, तसेच सल्फर आणि नायट्रोजनचे ऑक्साइड्‌स जे कारखान्यातील प्रदूषणाद्वारे – म्हणजे ऍसिड, पाऊस आणि धूळ यांद्वारे येतात.

माझ्या मैत्रिणीची बहीण नेहमीच सभोवतालच्या कामाच्या परिस्थितीवर अगदी भरभरून बोलायची, विशेषतः थंड ‘एसी’मधील स्थितीवर, कारण एक दिवस कुणाला तरी तीव्र (एकवटलेली) लघवी झाली व तिला दवाखान्यात भरती करावे लागले… कशामुळे… तर पाणी कमी प्यायल्यामुळे!!
पाणी हे सगळ्या द्रव पदार्थांमधील सगळ्यात कॉमन लिक्वीड असून ते सगळ्यां सजिवांच्या.. छोट्याशा झाडापासून, एकपेशीय कीटकापासून ते सर्वांत क्लिष्ट जिवंत प्राणी म्हणजेच मानवापर्यंत जीवनासाठी आवश्यक आहे. हे सजीव प्राणी एकवेळ इतर पोषक घटकांविना बरेच दिवस जिवंत राहू शकतील पण पाण्यावाचून ते लगेच मरतात. आपल्या शरीराचा दोन तृतियांश भाग हा पाण्याने व्यापलेला असून सगळे अवयव, टिश्यू आणि शरीरातील द्रव पदार्थात पाणी हा एक महत्त्वाचा घटक आहे. शरीराचे काहीच भाग जसे हाडे, दात आणि केस यांच्यामध्ये फारच थोडे पाणी असते. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की माणूसाच्या शरीरात जेवढी चरबी जास्त असेल तितके त्याच्या शरीरात पाणी कमी असते. चरबीचे प्रमाण वाढले की साधे मास कमी होते आणि एकूण पाणी कमी होऊन फक्त ५०% उरते.

दररोज दोन लीटर पाणी का प्यायचे?…
शरीरातून पाणी सतत कमी होत असते, आणि म्हणून आपल्याला पाण्याचे योग्य प्रमाण राखण्यासाठी व पाण्याची झालेली उणीव भरून काढण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते.
शरीरातील इतर आवश्यक घटकांप्रमाणे बरेच पाणी त्यावर काही रासायनिक प्रक्रिया न होताच शरीराच्या बाहेर पडते. शरीरात आलेले पाणी आणि तिथून बाहेर पडणारे पाणी यामध्ये संतुलन राखण्यासाठी आपल्याला शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता भरून काढावी लागते. आपल्या शरीराची कार्ये पार पाडण्याकरता आपल्याला दिवसाला दोन लीटर पाण्याची आवश्यकता असते आणि तेवढे आपण सेवन केलेच पाहिजे कारण आपल्या शरीरात पाणी साठवण्याची कोणतीही तरतूद नाही. आता आपण पाण्याची ही सततची मागणी तहानेच्या रूपात अनुभवतो. आपल्या शरीरातील आमाशय, आतडे, पॅन्क्रियाज आणि इतर पचनसंस्थेतील अवयवांच्या स्रावांच्या माध्यमातून आणि आपण सेवन करीत असलेल्या २ लीटर पाण्याबरोबर एकूण ८ लीटर पाणी आपल्या अन्ननलिकेमध्ये जात असते ज्यापैकी फक्त ६० ते १५० मिलीलीटर पाणी हे मलाबरोबर बाहेर पडते, ही खूप आश्‍चर्याची बाब आहे. एका तासाला जर १ लीटर पाणी शरीराच्या बाहेर पडत असेल तर तीव्र स्वरुपाचा डायरिया उद्भवतो.
पाण्याचे फायदे ः
१. बरेचसे पाणी हे भौतिक बदलासाठी लागते आणि काही रासायनिक बदलासाठी वापरले जाते- जसे पचनाच्या वेळी आहार घटकांचे विघटन करण्यासाठी पाण्याची गरज असते. याउलट शोषून घेतलेल्या आहाराचे ऑक्सीडेशन होतेवेळी शरीराला ऊर्जा दिली जाते व पाणी बाहेर सोडले जाते.
२. शरीरातील पेशींच्या आत आणि बाहेर सतत पाण्याचा प्रवाह चालू असतो. त्या दोहोमधील संतुलन पाण्यामुळे राखले जाते.
३. बर्‍याच रासायनिक संयुगांकरता पाणी हे विरघळण्याचे माध्यम असते, ज्यामध्ये रासायनिक क्रिया घडतात.
४. पाणी हे शरीराचे तापमान योग्य राखते. शरीराचे तापमान जास्त वाढू नये यासाठी घाम येणे हा प्राथमिक स्वरुपाचा मार्ग आहे.
५. शरीरातील निरुपयोगी घटक बाहेर टाकण्याचे कार्य पाण्यामुळे होते.
शरीरातील सर्वांत निरुपयोगी घटक हे पाण्यात विरघळणारे असतात आणि ते लघवीद्वारे शरीराबाहेर टाकले जातात. याशिवाय, यकृतामधील मेटॅबोलिझमच्या क्रियेत कधी कधी चरबीमध्ये विरघळणारे पदार्थ हे पाण्यात विरघळणार्‍या पदार्थांमध्ये रुपांतरित केले जातात जेणे करून ते लघवीद्वारे बाहेर टाकले जातात. शरीरातील प्रमुख निरुपयोगी घटक म्हणजे युरिया, जो प्रथिनांच्या सेवनाचा परिणाम असतो. जितके जास्त प्रथिनांचे सेवन केले जाते तितकी जास्त लघवीमध्ये युरिया (नायट्रोजन) बाहेर काढण्याची गरज असते. एकूण लघवी तयार होणे हे सर्वस्वी प्रथिने व मीठाच्या सेवनावर अवलंबून असते. हे घटक आपल्याला जास्त प्रमाणात बाहेर टाकायचे असतात म्हणूनच जास्त पाणी किंवा द्रव शरीराच्या बाहेर पडायला पाहिजे. जास्तीची प्रथिने आणि सोडियमचे सेवन टाळून आपण लघवीचे प्रमाण कमी करू शकतो जे नेहमीच अवकाशयानात केले जाते.
६. गुडघे आणि शरीराच्या इतर सांध्यांमध्ये पाणी हे वंगण तयार करण्यास मदत करते. ते लाळ, बाईल आणि ऍम्निऑटिक फ्लुइड यांचा पायाभूत घटक आहे.
‘तहाने’कडे दुर्लक्ष केले तर काय होईल?…
– शरीरात पाणी जास्त जपून ठेवावे लागेल.
– सोडिअम साचून राहिल्यामुळे शरीरावर सूज येईल.
– तीव्र स्वरूपाची (एकवटलेली) लघवी होईल – दिवसातून निरोगी माणसाला कमीत कमी १-२ लीटर लघवी व्हायला पाहिजे. जर कमी होत असेल, विशेषतः ६०० मिली.पेक्षा कमी होत असेल तर मूत्रपिंडावर तीव्र लघवी तयार करण्याची सक्ती केली जाते.
– डिहायड्रेशन
– बद्धकोष्ठता
– मूत्रपिंडातील खडे

‘तहान लागणे’ हा केव्हा खात्रीलायक इशारा नसतो?…
जर एखादी व्यक्ती पुरेशा प्रमाणात पाणी पीत नसेल, शरीर आपल्याला तहान लागल्याचा इशारा करते, पण तहान हा काही पाणी संपल्याचा संवेदनशील इशारा नसतो. आजारपणात, म्हातारपणी आणि जोमदार ऍथलेटिक्स कार्यक्रमात तहान हा कधीच खात्रीचा इशारा ठरत नसतो. ऍथलीट्‌सनी त्यांच्या प्रशिक्षण सरावामध्ये त्यांच्या शरीरातून किती पाणी कमी होणार आहे आणि त्यामुळे सरावाच्या अगोदर आणि नंतर त्यांना किती प्रमाणात पाण्याची गरज राहणार आहे हे ठरवूनच तसे पाण्याचे सेवन करावे. आजारी मुले विशेषतः ताप असताना, डायरियामध्ये आणि जेव्हा खूप घाम येतो त्यावेळी त्यांना भरपूर पाणी पिण्याची आठवण करून देणे हिताचे ठरते. वयस्कर लोकांमध्ये सर्वसाधारणपणे आणि इस्पितळांमध्ये त्यांच्या शरीरातील पाण्याचे सेवन आणि किती द्रव बाहेर पडते याची नोंद करणे हिताचे ठरते. एक प्रवासी ज्याला ३ तासांपेक्षा जास्त वेळ विमानात प्रवास करायचा असतो त्याच्या शरीरातून कोरड्या हवेमुळे जवळपास १.५ लीटर पाणी बाहेर टाकले जाते म्हणून त्यांनी जास्त पाणी प्यायला हवे.
माणूस गरम आणि दमट वातावरणापेक्षा गरम आणि कोरडे वातावरण जास्त चांगल्या प्रकारे सहन करू शकतो कारण त्यावेळी त्याला घाम कमी येतो. गरम आणि दमट हवामानात संपूर्ण घामाचे बाष्पीभवन होऊ शकत नाही, त्यामुळे घाम सतत त्वचेवरच जमा होतो किंवा कपड्यांमध्ये जिरतो. हा घाम शरीराला थोडं थंड तर करतोच कारण पाण्याचे वाफेत रुपांतर तर होतच असते. म्हणून लोकांना त्यामुळे थोडी गरमी आणि चिकटपणा जाणवतो.
आपल्या त्वचेच्या छिद्रातून पाण्याचे बाष्पीभवन झाल्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. शारीरिक श्रम, ताप, गरमीत राहिल्यामुळे किंवा शरीरातील काही मेटॅबोलिक क्रियांमुळे जे शरीराचे तापमान वाढते ते अगदी थोड्या प्रमाणात सहन केले जाते. पण जसे शरीराचे तापमान जास्त वाढत जाते, भोवतालच्या टिश्यूमधील पाणी जास्त उष्ण ऊर्जा शोषून घेते. जेव्हा पाणी पुरेशी उष्ण ऊर्जा शोषून घेते, तसे त्वचेच्या छिद्रातून त्याचे बाष्पीभवन होते आणि थंड वातावरण निर्माण केले जाते. घामाच्या प्रत्येक लीटरमागे शरीराची जवळपास ६०० किलोकॅलरी ऊर्जा कमी होते. अन्नातील ६० टक्के रासायनिक ऊर्जा ही थेट शरीराच्या उष्णतेत रुपांतरित होते. फक्त ४० टक्के ही एटीपी ऊर्जेत रुपांतरित होते आणि त्या ऊर्जेमुळे सुद्धा शरीराचे तापमान उष्ण होते. उलटपक्षी जर ही उष्णता शरीरात निर्माण झालीच नाही तर एन्झाइम्सचे कार्य सक्षमपणे होणारच नाही, म्हणून तर शरीराला व्यायामाची गरज असते.

बाटलीतले पाणी की उकळलेले पाणी… तुम्ही ठरवा!
आज आपल्याला पाण्याचे स्रोत, त्यातील क्षारांचे प्रमाण आणि कार्बोनेशन नुसार बर्‍याच प्रकारचे बाटलीबंद पाणी उपलब्ध झालेले आहे. सगळ्याच पाण्याच्या बाटल्यांवर त्यांनी लेबल लावून त्यावर त्याचा स्रोत – जसे विहीर, झरा, गीझर, सार्वजनिक नळ यांचा उल्लेख केलाच पाहिजे. नुकत्याच केल्या गेलेल्या ईपीएच्या परीक्षणात असे आढळून आलेले आहे की ५० टक्के पाण्याच्या बाटल्यांमध्ये सार्वजनिक नळाचे पाणी भरले जाते, जे फिल्टरद्वारे स्वच्छ करून घरांमध्ये आपण वापरतो. झर्‍याच्यावा विहिरीच्या पाण्यात कॅल्शिअम, फ्लोरीन, मॅग्नेशियमची कमतरता असते, आणि ते सार्वजनिक नळाचे असल्यामुळे त्यामध्ये संसर्गपण झालेला असू शकतो. हे बाटलीतील पाणी बरेच महाग असते. म्हणजे जे साधे नळाचे पाणी असते जे आपल्याला फुकटात सहज उपलब्ध असते त्याच पाण्यासाठी आपल्याला जास्त पैसे मोजावे लागतात. म्हणूनच बाटलीतील पाणीसुद्धा स्थानिक आरोग्य केंद्रात तपासून घेऊन मगच त्याचे सेवन केले पाहिजे – कारण ‘शुद्ध नैसर्गिक पाणी’ अशी गोष्ट आज अस्तित्वातच नाही. पावसाचे पाणी जे सर्वांत नैसर्गिक व शुद्ध समजले जाते त्यातसुद्धा काही विरघळलेले वायु असतात जसे ऑक्सीजन आणि कार्बन-डाय-ऑक्साईड, तसेच सल्फर आणि नायट्रोजनचे ऑक्साइड्‌स जे कारखान्यातील प्रदूषणाद्वारे – म्हणजे ऍसिड, पाऊस आणि धूळ यांद्वारे येतात. झरा आणि विहीरीच्या पाण्यात पावसाच्या पाण्याच्या तुलनेत विरघळलेले मीठ आणि वनस्पती आणि सांडपाण्याचे अशुद्ध घटक असतात. आधुनिक जीवनात स्वच्छ-शुद्ध पाणी हे फार गरजेचे झालेले आहे आणि म्हणूनच पाण्यावर काळजीपूर्वक प्रक्रिया केली गेली पाहिजे. आता सुरक्षित पाणी पिण्याच्या कायद्यानुसार किती जण जागरूक आहेत..?

******
– हा उन्हाळा आणि येणार्‍या पावसाळ्यात भरपूर आणि शुद्ध पाणी पिऊनच निरोगी रहा.
– दर दिवशी कमीत कमी २ लीटर पाण्याचे सेवन करा.
– २० ते २५ मिनिटे पाणी उकळा ज्यामुळे जंतूंना दूर ठेवता येईल.
– प्रथिने आणि सोडीयमचे सेवन मर्यादित प्रमाणात ठेवा.
*****