पाच लाखांपेक्षा कमी उत्पन्नधारकांना मिळू शकतात ३ मोफत गॅस सिलिंडर

0
23

>> नियमावली तयार करण्याचे काम सुरू; मंत्री गावडेंची माहिती

राज्य सरकारच्या वार्षिक तीन घरगुती गॅस सिलिंडर मोफत देण्याच्या योजनेचा लाभ वार्षिक चार ते पाच लाख रुपये उत्पन्न असणार्‍या कुटुंबांना देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. या मोफत गॅस सिलिंडर योजनेचे नियम तयार करण्याचे काम सुरू असून, आगामी आठ दिवसात नियम निश्‍चित केले जातील, अशी माहिती ग्रामविकास मंत्री गोविंद गावडे यांनी काल दिली.
विधानसभा निवडणुकीत भाजपने वचननाम्यात राज्यातील प्रत्येक कुटुंबाला वार्षिक ३ घरगुती गॅस सिलिंडर मोफत देण्याचे आश्‍वासन दिले होते.

ग्राम विकास खात्याने या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली असून, नियमावली तयार केली जात आहे. राज्यातील साधारण ५० टक्के आसपास कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. चार ते पाच लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणार्‍या कुटुंबांना मोफत सिलिंडर देण्याबाबत विचार केला जात आहे. या योजनेबाबत नियमावली तयार झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून योजनेला अंतिम स्वरूप दिले जाणार आहे, अशी माहिती गावडे यांनी दिली.