आरोग्य विभागाने आरोग्य ना हरकत दाखल्यासाठी येणार्या सर्व अर्जांवर त्वरित प्रक्रिया करून कामकाजाच्या पाच दिवसांत अर्जदाराला आरोग्य ना हरकत दाखला द्यावा. तसेच या कालावधीत ना हरकत दाखला न दिल्यास तो दाखला दिल्याचे गृहीत धरावे, असे परिपत्रक सार्वजनिक आरोग्य विभागाने नुकतेच जारी केले आहे.
आरोग्य खात्याने ना हरकत दाखल्यासाठीच्या काही अटी शिथिल केल्या आहेत. अर्जदाराकडून ना हरकत दाखल्यासाठी बांधकामांसंबंधीचा भोगवटा प्रमाणपत्र किंवा पूर्णत्व प्रमाणपत्र याशिवाय अन्य कुठल्याही दाखल्याचा आग्रह धरू नये, असे परिपत्रकात म्हटले आहे. वीज आणि पाणी जोडणीसाठी आरोग्य खात्याकडून ना हरकत दाखला घेतला जातो. हा दाखला देण्यासाठी बांधकामाच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी करावी लागते. त्यामुळे ना हरकत दाखला देण्यास जास्त वेळ लागतो. व्यवसाय सुलभते अंतर्गत आरोग्य खात्याने ना हरकत दाखला देण्याची प्रक्रिया सुटसुटीत करण्याचा निर्णय घेतला आहे.