उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२ च्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १२ जिल्ह्यांतील ६१ जागांसाठी काल ५६ टक्के मतदान झाले. या टप्प्यात सुलतानपूर, चित्रकूट, प्रतापगड, कौशांबी, प्रयागराज, बाराबंकी, अयोध्या, बहराइच, श्रावस्ती, गोंडा, अमेठी आणि रायबरेली जिल्ह्यात मतदान झाले.
६९३ उमेदवार निवडणूक रिंगणात
निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात ६१ विधानसभा मतदारसंघात ६९३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यापैकी ९० महिला उमेदवार आहेत. निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात एकूण २५,९९५ मतदान केंद्रे आणि १४०३० मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली होती. तसेच कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त मतदारांची १२५० संख्या ठेवण्याच्या सूचना आयोगाने दिल्या होत्या.
या टप्प्यासाठी अयोध्या ते प्रयागराज आणि चित्रकूट या धार्मिक भागात मतदान झाले. अमेठीच्या माजी संस्थानाचे प्रमुख संजय सिंह यावेळी अमेठीतून भाजपचे उमेदवार आहेत. तर राज्य सरकारचे मंत्री राजेंद्रप्रताप सिंह, प्रतापगड जिल्ह्यातील पट्टी, उद्योगमंत्री सिद्धार्थनाथ सिंह, प्रयागराज जिल्ह्याचा पश्चिम विधानसभा मतदारसंघातून तर नागरी विमान वाहतूकमंत्री नंद गोपाल गुप्ता नंदी या जिल्ह्याच्या दक्षिणेतून नशीब आजमावत आहेत.