पाकमधील हत्यासत्र

0
14

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईद याचा जवळचा साथीदार मुफ्ती कैसर फारूख याची अज्ञात हल्लेखोराने कराचीत नुकतीच जवळून गोळ्या झाडून हत्या केली. भारताचा आणखी एक शत्रू मारला गेला. पाकिस्तानात एखादा कुख्यात दहशतवादी किंवा त्याचा जवळचा साथीदार अशा प्रकारे मारला जाण्याची ही पहिलीच घटना नाही. यावर्षीच अशा कित्येक दहशतवाद्यांची अज्ञात हल्लेखोरांनी गूढरीत्या जवळून गोळ्या झाडून हत्या झाली आहे. कॅनडामध्ये खलिस्तानवादी दहशतवाद्यांचा लागोपाठ खात्मा झाला, त्याचा ठपका त्या देशाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी त्वरित भारतावर ठेवला, परंतु पाकिस्तानच्या प्रमुख नेत्यांची तेथील सध्याच्या आणि आर्थिक अस्थिरतेच्या काळात, भारताकडे अशा प्रकारे थेट बोट दाखवण्याची हिंमत झालेली नाही. मात्र पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्याने भारताकडून इतर देशांमध्ये अशा हत्या घडविल्या जात असल्याचा आरोप अलीकडेच केला. पाकिस्तानात या वर्षी अशा प्रकारच्या हल्ल्यांमध्ये जे जे मारले गेले, ते सर्व भारताचे शत्रू आहेत ही बाब लक्षणीय आहे आणि ही नामावली मोठी आहे. याच महिन्यात रियाझ अहमद ऊर्फ अबू काश्मिरी हा पाकव्याप्त काश्मीरमध्ये मारला गेला. आपल्या काश्मीरच्या राजौरीमध्ये धंगरी गावी जो भ्याड दहशतवादी हल्ला झाला होता, त्याचा हा सूत्रधार होता आणि गेली अनेक वर्षे पाकिस्तानच्या आश्रयाला होता. कारी खुर्रम शेहजाद याची पाकिस्तानच्या नाझियाबादमध्ये अशीच हत्या झाली. कराचीत मौलाना झियाउर रेहमान हा संध्याकाळी फेरफटका मारायला चालला असताना त्याचा खात्मा झाला. फेब्रुवारीत अल बद्र मुजाहिद्दीनचा एक हस्तक सय्यद खालीद रझा ह्याची हत्या झाली. भारताच्या आयसी 814 विमानाचे ज्या पाचजणांनी कंदाहारला अपरहण केले होते, त्यापैकी मिस्त्री झहूर इब्राहिम यालाही कराचीत अज्ञात हल्लेखोराने अस्मान दाखवले. कुख्यात दहशतवादी सय्यद सलाहुद्दिनचा सहकारी बशीर अहमद पीर ऊर्फ इम्तियाज आलम याचीही यंदा फेब्रुवारीत हत्या झाली. सय्यद नूर शालोबार ह्या दहशतवाद्याची खैबर पख्तूनख्वामध्ये, तर आयसिसच्या हिंद खुरासानचा म्होरक्या इजाज अहमद अहांगारची अफगाणिस्तानात हत्या झाली. सर्वांत कडी झाली ती गेल्या 23 जूनला जमात उद दावाचा म्होरक्या आणि भारताचा क्रमांक एकचा शत्रू हाफीज सईद याच्या लाहोरजवळील जौहर गावच्या घराबाहेर कार बॉम्बचा मोठा स्फोट झाला तेव्हा. त्या हल्ल्यातून हाफीज बचावला. मात्र, पाकिस्तानात राहून भारतविरोधी कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांचे धाबे ह्या सातत्यपूर्ण हत्यांनी दणाणले आहेत. हाफीज सईदवरील हल्ल्याने तर पाकिस्तानातील दहशतवादी आणि त्यांची पाठीराखी आयएसआय एवढी चवताळली की त्यानंतर चारच दिवसांनी जम्मू विमानतळावर द्रोनद्वारे स्फोटकांचा स्फोट घडविण्याचा प्रयत्न झाला होता. पाकिस्तानात राहून केवळ काश्मीरमध्ये घातपात घडवणाऱ्या दहशतवाद्यांचीच नव्हे, तर पाकिस्तानात राहून खलिस्तानवादाला खतपाणी घालणाऱ्यांचीही झोप सध्या उडालेली आहे. खलिस्तान कमांडो फोर्सचा दहशतवादी परमजितसिंग पंजवारची पाकिस्तानात झालेली हत्या कॅनडामधील हत्यांशी साधर्म्य दाखवणारी आहे. ह्या सगळ्या हत्यांमागे भारत असल्याचा कोणताही पुरावा नाही. परंतु मारले गेलेले हे सगळेच्या सगळे भारताचे शत्रू आहेत! पाकिस्तानात झालेल्या हत्या ह्या दहशतवादी टोळ्यांमधील अंतर्गत संघर्षातून झाल्याचा दावाही केला जात आहे. जमात उद दावाचा म्होरक्या हाफीज सईदचा मुलगा तल्हा ह्याने त्या दहशतवादी संघटनेची सूत्रे हाती घेतल्याने त्या संघटनेत अंतर्गत सत्तासंघर्ष उफाळला असल्याचेही सांगितले जात आहे. पाकिस्तानच्या आयएसआयने हा संघर्ष मिटवण्याचे आटोकाट प्रयत्न केले, परंतु त्यांना त्यात यश आले नाही असाही एक तर्क आहे. काही असो, पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे हत्यासत्र काही थांबताना दिसत नाही. आणि हे सगळे भारताचे शत्रू असल्याने भारताकडे संशयाची सुई वळवण्याचा प्रयत्न चालला आहे. आयएसआयने आता आपल्या भारतविरोधी हस्तकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यास सुरुवात केलेली आहे. मात्र, कधी कोण नऊ एमएमचे पिस्तूल घेऊन उगवेल आणि भारताच्या ह्या शत्रूंचा खात्मा करील ह्याची शाश्वती उरली नसल्याने, बालाकोट कारवाईनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादेतील जाहीर सभेत दिलेल्या ‘घर में घुसके मारेंगे’ च्या इशाऱ्याची आणि ‘वो अगर सातवे पाताल में भी छुपे हो तो खींच कर निकालके मारूंगा’ ह्या वाक्याची आठवण ह्या सगळ्यांची झोप उडवून गेली आहे एवढे खरे! भारतात लोकसभा निवडणूक जवळ येत चालली आहे, त्यामुळे तर त्यांची ही चिंता अधिकच वाढली आहे!