पाकचे दलाल

0
125

उशिरा का होईना, राष्ट्रीय तपास संस्थेने काश्मिरी फुटिरतावादी आणि त्यांना पाकिस्तानातून येणारा पैसा पुरवणारे हवाला ऑपरेटर यांच्यावर अखेर आपले जाळे टाकले. काश्मीर आणि दिल्लीत मिळून एकवीस ठिकाणी शनिवारी छापे टाकले गेले. सव्वाशे कोटीहून अधिक रोकड जप्त केली गेली. कदाचित काहींच्या मुसक्याही आवळल्या जातील. ‘इंडिया टुडे’ वृत्तवाहिनीने गेल्या सोळा मे रोजी फुटीरतावादी आणि हवाला ऑपरेटर यांच्यातील या साट्यालोट्यावर स्टिंग ऑपरेशन केले होते, तेव्हा ‘रसद तोडा’ या अग्रलेखातून काश्मिरी फुटिरतावाद्यांना पाकिस्तानातून कसा पैसा पुरवला जातो, त्याच्या मदतीने खोरे कसे धुमसत ठेवले गेलेले आहे त्याकडे आम्ही लक्ष वेधले होते. साळसूदपणे वावरणार्‍या हुर्रियतच्या नेत्यांशी पाकिस्तानने संधान बांधलेले आहे आणि त्यांच्यामार्फत हा पैसा संबंधितांना पुरविला जात असतो याची स्पष्ट कबुली त्या नेत्यांनीच सदर वृत्तवाहिनीच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये दिली होती. त्यामुळे एनआयएची ही कारवाई स्वागतार्ह जरी असली, तरी ती करण्यासाठी एखाद्या वृत्तवाहिनीला स्टिंग ऑपरेशन करण्याची पाळी का आली हा खरा प्रश्न आहे. भारत सरकारची इंटेलिजन्स ब्युरो किंवा विदेशात गुप्तहेरी करणारी ‘रॉ’ कुठे झोपली आहे? त्यांना या हवाला ऑपरेटरांमार्फत चाललेल्या व्यवहारांचा मागमूस नव्हता का? दिल्लीच्या चॉंदनी चौकपासून श्रीनगरपर्यंत पसरलेल्या या धाग्यादोर्‍यांची यत्किंचितही कल्पना आपल्या गुप्तचर यंत्रणांना नसावी हे आश्चर्यकारक आहे. की माहीत असूनही हुर्रियतला चुचकारण्याच्या आजवरच्या सरकारांच्या धोरणांपोटी त्याकडे कानाडोळा चालवला जात होता? गेल्या वर्षी जुलैमध्ये बुरहान वानी मारला गेल्यानंतर काश्मीर खोरे सतत धुमसते आहे. दगडफेकीविना खोर्‍यात एकही दिवस जात नाही. सुरक्षा यंत्रणांनी दहशतवाद्यांविरुद्ध मोहीम राबवली तरी त्यालाही पाकिस्तानच्या स्थानिक दलालांकडून जोरदार विरोध होतो. नुकताच सबजार भट साथीदारासह मारला गेला, तेव्हा त्याच्या तिसर्‍या सहकार्‍याला वाचवण्यासाठी पाकिस्तानचे काही दलालच पुढे झाले आणि त्यांनी हल्लागुल्ला करून त्याला सुरक्षितरीत्या जाऊ दिले असे स्पष्ट झालेले आहे. म्हणजे दिवसेंदिवस या दलालांची भीड चेपत चालली आहे. कुचकामी राज्य सरकार, निष्प्रभ पोलीस दल आणि हतबल लष्कर आणि केंद्र सरकार याचा फायदा उठवीत ही मंडळी मोकाट सुटली आहेत. हिज्बुल मुजाहिद्दीन ज्या प्रकारे काश्मीरमध्ये सक्रिय झालेली दिसते आहे, स्थानिक दहशतवाद्यांची भरती करताना आणि दक्षिण काश्मीरमध्येच त्यांना शस्त्रास्त्र प्रशिक्षण देताना दिसते आहे ते पाहिल्यास तेथील परिस्थिती किती बिघडलेली आहे याचे दर्शन घडते. काश्मीर पेटवण्यासाठी पाकिस्तानातून पैसा येतो. आयएसआय तर पुरवतेच, पण तेथील जनतेकडून देणग्या गोळा करून हवाला ऑपरेटरांमार्फत श्रीनगरमध्ये पाठवला जातो. एनआयएच्या तपासात त्याला पुष्टी मिळालेली आहे. ही रसद सुरू आहे म्हणूनच तर काश्मीरमधील हिंसाचार कायम राहिला आहे. अगदी दिल्लीपर्यंत त्याचे धागेदोरे आहेत ही गंभीर बाब आहे. काश्मिरींचे देशभरात जे व्यवसाय चालतात, त्यांची वैधता तपासण्याची आवश्यकता त्यामुळे निर्माण झाली आहे. पाकिस्तानकडून पैसे येणारा नईम खान, तेहरिक इ हुर्रियतचा गाझी जावेद बाबा, अनेक काश्मिरी पंडितांना आपण कसे निर्दयपणे मारले याच्या फुशारक्या मारणारा बिट्टा कराटे हे सगळे आजवर मोकाट कसे फिरत होते? आता तर हुर्रियतचा कडवा नेता सईद अली शाह गिलानीविरुद्धही गुन्हा नोंद झाला आहे. हे सगळे लोक साळसूद चेहर्‍याने काश्मीरमध्ये वावरू शकतात म्हणून पाकिस्तानला आपले मनसुबे सिद्धीस नेता येतात हेच सत्य या कारवाईतून अधोरेखित झालेले आहे.