पहिल्या दिवशी १४ उड्डाणे

0
18

मोप पेडणे येथील न्यू गोवा मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देशांतर्गत विमान वाहतुकीला काल प्रारंभ झाला असून सकाळी ९ वाजता हैदराबादहून आलेले इंडिगो विमान हे विमानतळावर उतरणारे पहिले व्यावसायिक विमान ठरले आहे. या नवीन विमानतळावर पहिल्या दिवशी संध्याकाळी ४ वाजेपर्यंत १४ उड्डाणे हाताळण्यात आली आहेत.

या विमानतळावरील विमान वाहतुकीच्या शुभारंभ कार्यक्रमात केंद्रीय नागरी वाहतूक राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंग यांनी आभासी पद्धतीने सहभाग घेतला. तसेच, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, वाहतूकमंत्री मावीन गुदिन्हो, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, ईडीसीचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे व इतरांनी सहभाग घेतला.

मुख्यमंत्री डॉ. सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी विमानतळावरील पहिल्या फ्लाईटचा पहिला बोर्डिंग पास वितरित केला. गोव्यात सर्व सुविधांनीयुक्त नवीन विमानतळाचे स्वप्न अखेर साकार झाले आहे. या विमानतळामुळे पर्यटन, व्यापार आणि व्यवसायासाठी गोव्याची क्षमता आणखी मजबूत होईल, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.
इंडिगो आणि गो-एअरसह अनेक विमान कंपन्यांनी मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणि तेथून दैनंदिन उड्डाणे आधीच जाहीर केली आहेत, इतर अनेक एअरलाइन्सकडून वाहतूक रूपरेषा निश्‍चित केली जात आहे.

मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील उड्डाण संचालनाची सुरुवात ही गोव्याच्या विकासाच्या एका नव्या अध्यायाची सुरुवात आहे. या विमानतळाद्वारे प्रवासी, विमान कंपन्या आणि सर्व भागधारकांना जागतिक दर्जाचा अनुभव देण्याच्या दिशेने सतत काम केले जाणार आहे. असे जीजीआयएएलचे सीईओ आर. व्ही. शेषन यांनी सांगितले.