पळसकटा-मोले येथे काल रविवारी (दि. 16) संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून जाताना रस्त्यावर कोसळून संजू बंदीगणावर (35, हलीयाळ- कर्नाटक) यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी हिट अँड रनचा संशय व्यक्त केला जात असून कुळे पोलीस अज्ञात वाहनाचा शोध घेत आहेत.
प्राप्त माहितीनुसार गोव्यात नोकरी करणाऱ्या ठिकाणी संजू बंदीगणावर हे रविवारी आपल्या मूळ गावाहून गोव्यात येत होते. त्यावेळी घरीकडून आणलेल्या तांदळाचे पोते दुचाकीच्या मागच्या बाजूने बांधले होते. पण पळसकटा येथे पोहचल्यावर दुचाकीसह रस्त्यावर कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला. सदर दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याचा संशय असून हा अपघात झाल्यानंतर सदर वाहनचालकाने पळ काढला असावा असे पोलिसांचे म्हणणे आहे. निरीक्षक राघोबा कामत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला.
दरम्यान शनिवारी रात्री उसगाव येथील नेसले कंपनीसमोरील रस्त्यावर कारची धडक बसून पादचारी (नाव समजू शकले नाही) जखमी झाला. अपघातानंतर तेथून निघून गेलेली कार फोंडा पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. जखमीवर गोमेकॉत उपचार सुरू आहे.