पर्यटन खात्यातर्फे मराठ्यांचा ‘आक्रमणकर्ते’ म्हणून उल्लेख

0
158

>> विरोधी पक्षांची राज्य सरकारवर टीका

>> पर्यटनमंत्र्यांकडून दिलगिरी

गोवा पर्यटन खात्याच्या अधिकृत ट्विटर हॅन्डल टुरिझम गोवावर आग्वाद ह्या ऐतिहासिक किल्ल्यासंबंधीची माहिती देताना ‘डच’ व ‘मराठे’ यांचा आक्रमणकर्ते असा उल्लेख करण्यात आल्याने राज्यात मोठा वाद निर्माण झाला. तद्नंतर पर्यटन खात्याने सदर पोस्ट मागे घेऊन त्याविषयीची दुरूस्ती करताना आम्हाला केवळ ‘डच’ यांनाच आक्रमणकर्ते असे म्हणायचे होते, असा खुलासा केला.

पर्यटन खात्याने मराठ्यांचा आक्रमणकर्ते असा उल्लेख केल्यामुळे काल विरोधी पक्षांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका केली. विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत तसेच गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रमुख व आमदार विजय सरदेसाई यांनी वरील प्रकरणावरून काल भाजप सरकारवर जोरदार टीका केली.

यासंबंधी काल जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात कामत म्हणाले की, राज्यातील भाजप सरकारच्या इतिहासाची छेडछाड करण्याच्या आपल्या धोरणामुळ त्यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या पराक्रमी थोर पुरूषाचा अवमान झाला आहे. शूर व पराक्रमी मराठ्यांना आक्रमणकर्ते संबोधणे हे घृणास्पद असल्याचे ते म्हणाले. गोवा सरकारचा आपण तीव्र शब्दांत निषेध करीत असून सरकारने देशभक्तांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी कामत यांनी केली आहे. या प्रश्‍नावरून फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनीही टीका केली आहे.

ट्विटरबाबत चौकशी सुरू : आजगावकर
मराठ्यांचा आक्रमणकर्ते असा जो अवमानास्पद असा उल्लेख गोवा पर्यटन खात्याच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलंवरून झाला त्याची चौकशी केली जात असल्याचे काल पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी दै. नवप्रभाशी बोलताना सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे पुत्र संभाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राबरोबरच गोव्यातील जनतेचीही दैवते होत. त्यामुळे अशा थोर पुरूषांचा आक्रमणकर्ते असा उल्लेख केल्याने गोव्यातील हजारो लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या असून त्यामुळे पर्यटनमंत्री या नात्याने आपण दिलगिरी व्यक्त करीत असल्याचे आजगावकर म्हणाले. थोर पुरूषांचा उल्लेख करताना काळजी घ्यायला हवी. अनावधानाने एकेकदा अशा चुका घडतात. पण अशा चुका होणार नाहीत यासाठी सर्वांनीच काळजी घ्यायला हवी. वरील चुकीमुळे पर्यटन खात्याला मनःस्ताप सहन करावा लागला. पण जाणुनबुजून कुणी अशा चुका करीत नाहीत हे लक्षात घेतले पाहिजे, असे आजगावकर यांनी स्पष्ट केले.