पर्यटन खात्याकडून युवराज सिंगला नोटीस जारी

0
14

माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याने मोरजी येथील व्हिलाची व्यावसायिक वापरासाठी नोंदणी न केल्याबद्दल पर्यटन खात्याने त्याला नोटीस बजावली असून, येत्या ८ डिसेंबरला व्हिला नोंदणी न केल्या प्रकरणी पर्यटन खात्याच्या उपसंचालकांसमोर हजर राहण्याची सूचना करण्यात आली आहे.

पर्यटन खात्याने राज्यातील हॉटेल व इतर आस्थापनांना नोंदणी करण्याची सूचना केली होती. पर्यटन खात्याने ज्या हॉटेल व इतर आस्थापनांनी निर्धारित काळात नोंदणी केलेली नाही. त्यांच्याविरोधात कारवाईला सुरुवात केली आहे. राज्यातील उत्तर आणि दक्षिण गोव्यातील अनेक हॉटेल्सना नोंदणी न केल्या प्रकरणी नोटीस बजावून कारवाई सुरू केली आहे. त्याच मोहिमेचा एक भाग म्हणून युवराज सिंग याला मोरजी येथील व्हिलाची पर्यटन खात्याकडे नोंदणी न केल्याप्रकरणी नोटीस पाठविण्यात आली आहे. नोटीसला उत्तर न दिल्यास आणि उपसंचालकांसमोर हजर न राहिल्यास त्याला १ लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठावण्यात येईल, असेही नोटिशीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

युवराज सिंगने ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर वरचावाडा-मोरजी, पेडणे येथील निवासी परिसर होमस्टे म्हणून सूचिबद्ध केला आहे. हॉटेल, गेस्ट हाउस चालवण्याआधी ते चालवण्याचा इरादा असलेल्या प्रत्येक व्यक्तीला विहित नमुन्यात संबंधित प्राधिकरणाकडे नोंदणीसाठी अर्ज करावा लागतो. पर्यटन विभागाच्या अधिकार्‍यांनी ११ नोव्हेंबर रोजी युवराज सिंग याच्या बंगल्याची अचानक तपासणी केली होती. त्यानंतर गोवा नोंदणी पर्यटन व्यापार कायदा, १९८२ अंतर्गत नोंदणीमध्ये चूक केल्याबद्दल तुमच्यावर दंडात्मक कारवाई का केली जाऊ नये, अशी विचारणा नोटिशीतून करण्यात आली आहे.