पर्यटनासाठी मर्यादित प्रमाणात कॅसिनो सुरू करण्याची गरज

0
278

>> मायकल लोबो ः मांडवीत सातव्या कॅसिनोचा प्रस्ताव नाही

मांडवी नदीत सातवा कॅसिनो आणण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. राज्यातील पर्यटन आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी कॅसिनो मर्यादित प्रमाणात सुरू करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन बंदर कप्तान मंत्री मायकल लोबो यांनी काल पत्रकारांशी बोलताना केले.
मांडवी नदीतील एका कॅसिनो कंपनीने जुन्या जहाजाच्या जागी दुसरे जहाज आणण्यासाठी प्रयत्न केला होता. तथापि, त्या जहाजाची लांबी जास्त असल्याने परवाना नाकारण्यात आला आहे, असे मंत्री लोबो यांनी सांगितले.

राज्यातील पर्यटन हंगामाला धिम्यागतीने प्रारंभ झाला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील चार्टर पर्यटनाला नोव्हेंबरपासून सुरूवात होणार आहे. यु.के., रशियातून चार्टर विमाने आणण्याची काही टूर ऑपरेटरांना तयारी चालविली आहे. चार्टर विमाने थेट गोव्यात आणण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली पाहिजे, असेही लोबो यांनी सांगितले.

केंद्र सरकारने लॉकडाऊनच्या काळात टूरिस्ट टॅक्सी, रेन्ट ए कार, रेन्ट ए बाईक आदींना वार्षिक परवान्याच्या नूतनीकरणासाठी मुदतवाढ देणारा आदेश जारी केलेला असताना राज्याच्या वाहतूक खात्याने टूरिस्ट टॅक्सी मालक व इतरांकडून परवान्याच्या नूतनीकरणाला उशीर झाल्याचे कारण पुढे करून त्यांच्या वाहनांच्या परवान्याचे नूतनीकरण करताना २५ टक्के जास्त शुल्क आकारले आहे. परवाने नूतनीकरणाचे अतिरिक्त शुल्क परत देण्याची विनंती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडे करण्यात आली आहे, असेही मंत्री लोबो यांनी सांगितले.

सोनसडोत कचरा प्रकल्पासाठी
२३ कोटींचा निधी मंजूर
सोनसडो मडगाव येथे लहान कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी २३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सोनसडो येथील विभक्त करण्यात आलेला जुना कचरा सिमेंट कंपनीला पाठविण्याचे काम सुरू आहे. सोनसडो कचरा प्रकल्पाच्या जागेत कचर्‍यावर प्रक्रिया करणारे चार लहान प्रकल्प उभारले जाणार आहे, असेही मंत्री लोबो यांनी सांगितले.

कॅसिनोमुळे
५० टक्के पर्यटक
मांडवी नदीतील कॅसिनोंच्या आकर्षणामुळे सुमारे ५० टक्के पर्यटक येतात. त्यामुळे आवश्यक सुरक्षा उपाययोजनांचा अवलंब करून कॅसिनो मर्यादित प्रमाणात सुरू करण्यावर विचार करण्याची गरज आहे. पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार असून राज्याच्या आर्थिक महसूल प्राप्त होऊ शकतो, असेही मंत्री लोबो यांनी सांगितले.