>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन; पणजी येथे महोत्सवाचा समारोप
गोवा सरकार संपूर्ण गोवा राज्य दिव्यांग व्यक्तींसाठी (पीडब्ल्यूडी) प्रवेश योग्य करणार आहे. दिव्यांग व्यक्तीच्या अंगभूत कलागुणांना चालना देण्यासाठी पर्पल महोत्सव दरवर्षी झाला पाहिजे. पुढील वर्षीचा पर्पल महोत्सव आयोजनासाठी हरयाणा राज्य उत्सुक आहे. तथापि, पर्पल महोत्सव आयोजनासाठी कुठलेही राज्य पुढे न आल्यास गोवा सरकार इफ्फीच्या धर्तीवर दरवर्षी पर्पल महोत्सवाचे आयोजन करण्याची तयारी आहे, असा पुनरुच्चार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पर्पल महोत्सवाच्या सांगता सोहळ्यात बोलताना येथे काल केला.
केंद्र सरकारने या देशातील पहिल्या पर्पल महोत्सवाचा ५० टक्के खर्च उचलण्याची तयारी दर्शविली आहे, देशातील दिव्यांग व्यक्तींसाठी आयोजित केलेल्या पहिल्या पर्पल महोत्सवाचे गोवा सरकारच्या समाज कल्याण खाते व इतरांनी यशस्वी आयोजन केले आहे.
या महोत्सवानिमित्त दिव्यांग व्यक्तींसाठी विविध स्पर्धा, चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवानिमित्त दिव्यांग व्यक्तींना फिरताना सुलभता व्हावी म्हणून आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या. मिरामार समुद्रकिनारी जाण्यासाठी सुविधा उपलब्ध केली होती. यापुढेही दिव्यांग व्यक्तींना सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
या समारोप सोहळ्याला केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल, माजी मुख्यमंत्री, आमदार दिगंबर कामत, समाज कल्याण खात्याचे सचिव सुभाष चंद्रा, दिव्यांग आयुक्त गुरुप्रसाद पावसकर, समाज कल्याण खात्याच्या संचालिका संध्या कामत व इतरांची उपस्थिती होती.
शेकडोंची उपस्थिती
या तीन दिवसीय महोत्सवात देशभरातून शेकडो दिव्यांग व्यक्तींनी हजेरी लावली. या महोत्सवानिमित्त आयोजित विविध स्पर्धातील विजेत्यांना मुख्यमंत्री डॉ. सावंत, केंद्रीय मंत्री नाईक यांच्या हस्ते बक्षिसे वितरीत करण्यात आली.