परराज्यांतून गायी, म्हशी आणण्यास बंदी

0
7

लम्पी त्वचारोग प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर उत्तर गोवा जिल्हाधिकार्‍यांकडून आदेश जारी; पशुसर्ंवधन खात्याकडून जनजागृती सुरू

उत्तर गोवा जिल्हाधिकार्‍यांनी उत्तर गोव्यात परराज्यांतून गायी, म्हशी आणण्यावर बंदी घालणारा आदेश काल जारी केला. हा आदेश कालपासून लागू करण्यात आला. देशातील अनेक राज्यांमधील गायींमध्ये लम्पी त्वचारोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून हा आदेश जारी करण्यात आला आहे. दरम्यान, देशात आतापर्यंत या त्वचारोगाने थैमान घातले असून, लाखो जनावरे संक्रमित झाली आहेत, तर हजारो मृत्यूमुखी पडली आहेत.

देशातील गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, हरयाणा, पंजाब आदी अनेक राज्यात लम्पी त्वचारोगामुळे हजारो गुरे मृत्युमुखी पडत आहेत. गोव्यात परराज्यांतून दुभत्या गायी, म्हशी आणण्यात येतात. या पार्श्‍वभूमीवर प्रशासन सतर्क झाले असून, लम्पी रोगाचा फैलाव होऊ नये म्हणून परराज्यातून गायी, म्हशी आणण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

राज्यातील गायी, म्हशी या जनावरांमध्ये अजूनपर्यंत घातक लम्पी रोग आढळून आलेला नाही. या लम्पी रोगाचा फैलाव रोखण्यासाठी प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पशुसर्ंवधन खात्याकडून लम्पी रोगासंबंधी दूध उत्पादक शेतकर्‍यांमध्ये जागृतीला सुरुवात झज्ञली आहे.
लम्पी विषाणू हा प्राण्यांमध्ये आढळणारा एक घातक रोग आहे. हा रोग दुभत्या जनावरांमध्ये आढळून येत असून, हा आजार प्रामुख्याने गायींमध्ये दिसून येत आहे.

देशातील अनेक राज्यात या लम्पी रोगाची लागण झालेल्या हजारो गायींचा मृत्यू झाला आहे. लम्पी विषाणू इतर निरोगी जनावरांमध्ये संक्रमित प्राण्याच्या संपर्कात आल्यानेच पसरतो. जागतिक पशू आरोग्य संघटनेने लम्पी विषाणूला अधिसूचित रोग घोषित केले आहे. त्यावर अद्याप निश्चित इलाज नाही. तथापि, केवळ लक्षणांच्या आधारेच उपचार केले जाऊ शकतात.

विषाणूजन्य त्वचारोग
लम्पी हा एक विषाणूजन्य त्वचारोग आहे, जो गायी व म्हशी या वर्गातील जनावरांना होतो. हा रोग कॅप्री पॉक्स या विषाणू प्रवर्गातील आहे. लम्पी हा रोग ज्या जनावरास होतो, त्या जनावरांच्या शरीरावर गोल आकाराच्या गाठी येतात. त्या कडक गाठी असतात. लम्पी हा रोग सर्व वयाच्या गायी व म्हशी यांना होतो. लहान जनावरांना हा आजार जास्त प्रमाणात होत आहे. हा रोग शेळ्या-मेंढ्या यांना होत नाही.
प्रसार कसा होतो?
या रोगाचा प्रसार मुख्यत्वे करून परजीवी कीटक विशेषतः डास, गोचीड, गोमाशा, घरातील माशा, त्याचबरोबर संक्रमित जनावरांच्या नाकातील, डोळ्यातील स्त्रावाने दूषित चारापाणी यामुळे होतो. संक्रमित जनावरांची वाहतूक, नवीन जनावरांची खरेदी यामुळे देखील या रोगाचा प्रसार होण्यास मदत होते.
लक्षणे कोणती?
साधारणपणे विषाणू शरीरात प्रवेश केल्यापासून चार दिवसांपासून ते पाच आठवड्यांपर्यंत केव्हाही या रोगाची लक्षणे दिसतात. शरीराचे तापमान वाढते. भूक मंदावते. लसिकाग्रंथी सुजतात. दूध उत्पादन कमी होते. नाका-डोळ्यांतून स्त्राव येतो. नंतर शरीरावर एक ते पाच सेंटीमीटर व्यासाच्या गाठी तयार होतात. त्या अनेक वेळा खोल मांसापर्यंत जातात. तोंडाच्या आतील भाग, श्वासनलिका या ठिकाणी या गाठी, अल्सर निर्माण होतात. डोळ्यांत देखील अल्सर होतात. त्यामुळे अंधत्व येऊ शकते.

दक्षिण गोव्यातही लवकरच आदेश जारी होणार
उत्तर गोवा जिल्हाधिकार्‍यांनी उत्तर गोव्यात परराज्यांतून जनावरे आणण्यास बंदी घातली असली, तरी अद्याप दक्षिण गोव्यात हा आदेश जारी झालेला नाही. मात्र हा आदेश लवकरच जारी होण्याची शक्यता आहे.

देशात ५० हजार जनावरांचा मृत्यू
देशपातळीवर सध्या लम्पी चर्मरोगाने थैमान घातले आहे. गावागावांतील अनेक पशुपालकांचे पशुधन विशेषतः गायी आणि काही प्रमाणात म्हशी या रोगाला बळी पडताना दिसतात. देशातील १२ राज्यात जवळजवळ १६५ जिल्ह्यातील ११.२५ लाख गाई-म्हशींमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. साधारणपणे ५० हजार जनावरांचा मृत्यू झाला आहे.