>> गोवा खंडपीठात पितळ उघडे; अहवाल देण्याचे निर्देश
गिरकरवाडा-हरमल येथील विकास निर्बंधित क्षेत्रात (एनडीझेड) माजी सरपंच बर्नाड फर्नांडिस यांच्या नातेवाईकांची अनेक बेकायदा बांधकामे असल्याचे स्पष्ट झाले असून, या प्रकरणी येत्या 14 फेब्रुवारीपर्यंत सविस्तर अहवाल प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करण्याचे निर्देश गोवा खंडपीठाने काल दिले.
हरमल येथील विकास प्रतिबंधित क्षेत्रातील बेकायदा बांधकाम प्रकरणाच्या याचिकेवर काल सुनावणी घेण्यात आली. हरमल येथील एका हॉटेलच्या बेकायदा बांधकाम प्रकरणानंतर गिरकरवाडा हरमल येथील विकास निर्बंधित क्षेत्रातील बेकायदा बांधकामाचे प्रकरण उघडकीस आले आहे. हरमलचे सरपंच बर्नाड फर्नांडिस यांना या बेकायदा बांधकामांच्या प्रकरणावरून काही दिवसांपूर्वीच सरपंचपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यांचे वडील व काका यांच्याकडून बेकायदा बांधकामांबाबत कालच्या सुनावणीत न्यायालयाने स्पष्टीकरण मागितले होते. या प्रकरणी सुनावणीच्या वेळी बर्नाड फर्नांडिस यांच्या नातेवाईकांची केवळ दोन बेकायदा बांधकामे नाहीत, तर त्यांच्या कुटुबांतील व्यक्ती व नातेवाईकांची अनेक बेकायदा बांधकाम असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.