पत्नीच्या खून प्रकरणी पतीला 10 दिवसांची पोलीस कोठडी

0
2

पत्नीचा दगडाने ठेचून खून केल्या प्रकरणी पती चेतन रत्नाकर गावकर याला 10 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी पती चेतन गावकर व त्याची पत्नी हेमा गावकर यांच्यात कडाक्याचे भांडण झाले होते. दोघांमधील वादानंतर हेमा गावकर आणि तिचा अडीच वर्षांचा मुलगा घरात झोपले होते. त्यावेळी रागाच्या भरात चेतन गावकरने झोपलेल्या अवस्थेत पत्नीच्या डोक्यावर दगडाने ठेचून खून केला. त्यानंतर मुलाला तळपण येथील मूळ घरात पोहोचवून वडिलांना खुनाची माहिती दिली. कुटुंबीयांना माहिती दिल्यानंतर चेतन गावकर हा थेट फोंडा पोलीस स्थानकात शरण गेला.

पोलीस उपअधीक्षक शिवराम वायगणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजयनाथ कवळेकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. शनिवारी रात्री उशिरापर्यंत शिरवाडा-शिरोडा येथील घरात फॉरेन्सिक पथकाने सुद्धा पुरावे गोळा केले.
गेल्या काही महिन्यापासून सदर पती-पत्नीमध्ये पटत नसल्याने अधूनमधून दोघांचे भांडण होत होते. तसेच लहान मुलाला सुद्धा हेमा गावकर ही चांगली वागणूक देत नव्हती असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. लग्नाला सात वर्षे पूर्ण झाली नसल्यामुळे या घटनेचा पंचनामा फोंडा उपजिल्हाधिकाऱ्यांकडून केला जाणार आहे. मात्र उपजिल्हाधिकारी रजेवर असल्याने सध्या धारबांदोडा तालुक्याचे उपजिल्हाधिकारी निलेश धायगोडकर यांच्याकडे फोंडा कार्यालयाचा ताबा आहे. सोमवारी उपजिल्हाधिकारी निलेश धायगोडकर या घटनेचा पंचनामा केल्यानंतर मृतदेहाची उत्तरीय तपासणी केली जाणार आहे.