>> ओपा जलप्रकल्पातील वीज केंद्रात तांत्रिक बिघाड
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ओपा येथील जलशुद्धीकरण प्रकल्पातील 33 केव्ही वीज केंद्रातील तांत्रिक बिघाडामुळे राजधानी पणजीसह तिसवाडी तालुक्यातील अनेक भागात काल पाण्याची टंचाई जाणवली. तिसवाडी तालुक्यातील पणजी, सांताक्रूझ, सांत आंद्रे, ताळगाव या मतदारसंघातील विविध भागात शनिवार 25 मेपर्यंत मर्यादित पाणीपुरवठा केला जाणार आहे, असे पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.
पणजी शहरामध्ये मागील काही दिवसांपासून अनियमित पाण्याचा पुरवठा होत आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत रस्त्यावर खोदकाम करताना जलवाहिनीची नासधूस झाल्याने पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली होती. त्यानंतर आता, ओपा पाणी प्रकल्पातील ट्रान्स्फॉर्मर नादुरुस्त झाल्याने पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. ओपा जलप्रकल्पातील वीज केंद्रात तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यातआले आहे.
काल पणजी आणि आसपासच्या भागात पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने रहिवाशांना त्रास सहन करावा लागला. टँकरद्वारे होणारा पाण्याचा पुरवठा अपुरा आहे. नागरिकांना खासगी टँकरच्या माध्यमातून पाणी विकत घ्यावे लागत आहे. ऐन उष्णता वाढीच्या काळात पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने नागरिक त्रस्त बनले आहेत.