>> पहिल्या टप्प्यात एका मार्गावर सहा बसगाड्या धावणार
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत पणजी शहरात कदंब वाहतूक महामंडळाच्या इलेक्ट्रिक बससेवेला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते काल प्रारंभ करण्यात आला. पहिल्या टप्प्यात केवळ एका प्रवासी मार्गावर सहा बसगाड्या चालविण्यात येणार आहेत.
यावेळी वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, कदंब वाहतूक महामंडळाचे अध्यक्ष आमदार उल्हास तुयेकर, आमदार रुडॉल्फ फर्नांडिस, महापौर रोहित मोन्सेरात व इतरांची उपस्थिती होती.
राज्य सरकारकडून प्रदूषण कमी करण्यासाठी राज्यातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्व सेवांसाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्यावर भर दिला जाणार आहे. पणजीतील रिक्षा, मोटरसायकल पायलट सेवेसाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर केला जाणार आहे. इलेक्ट्रिक वाहन सेवेसाठी सर्व संबंधितांना विश्वासात घेतले जाणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
पणजी शहरातील विविध भागांत प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसगाड्यांच्या मालकावर अन्याय केला जाणार नाही. त्यांच्या प्रश्नावर योग्य तोडगा काढला जाणार आहे. पणजीतील खासगी बसगाड्यांचा कदंब महामंडळाच्या माझी बस योजनेमध्ये समावेश केला जाऊ शकतो. माझी बस योजनेंतर्गत सध्या 57 बसगाड्या कार्यरत आहे आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू केलेल्या पहिल्या इलेक्ट्रिक बसमधून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पणजी बसस्थानक ते पर्वरी येथील मंत्रालयापर्यंत प्रवास करून मंत्रालय गाठले. या बसमधून माविन गुदिन्हो, उल्हास तुयेकर व इतरांनी देखील प्रवास केला.
सध्या कुठल्या मार्गावर चालणार बसगाड्या?
कदंब महामंडळाकडून पणजी कदंब बसस्थानक, मिरामार, दोनापावल, गोवा विद्यापीठ, बांबोळी, सांताक्रुझ या एकाच मार्गावर पहिल्या टप्प्यात सहा बसगाड्या चालविण्यात येणार आहेत.
सात प्रवासी मार्गावर एकूण 48 बसगाड्या चालवणार
कदंब महामंडळाकडून स्मार्ट सिटी अंतर्गत पणजीमध्ये पहिल्या टप्प्यात 6 ईव्ही बसगाड्या चालविण्यात येणार आहेत. पुढील 15 दिवसांत या सेवेला आणखी बसगाड्या जोडण्यात येणार आहेत. पणजी परिसरात सात प्रवासी मार्गावर एकूण 48 इलेक्ट्रिक बसगाड्या चालविण्यात येणार आहेत, असे कदंब महामंडळाचे अध्यक्ष आमदार उल्हास तुयेकर यांनी सांगितले.