पणजीतील वाहतूक कोंडी कायम

0
21

येथील मांडवी नदीवरील अटल सेतू हा तिसरा पूल दुरुस्तीमुळे वाहतुकीस बंद असल्याने आणि पणजी शहरातील रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक आणि नागरिक त्रस्त बनले आहेत.
सध्याच्या दिवसात पणजी शहरात प्रवेश करणे म्हणजे डोकेदुखी बनली आहे. मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागणार असल्याने वाहनचालक, नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी पणजीत येणाऱ्या अवजड वाहनांवर निर्बंध घालण्याचा आदेश जारी केला आहे, तरीही येथील कदंब बसस्थानक, मेरशी जंक्शन, पर्वरी आणि महानगरपालिका क्षेत्रातील विविध भागात वाहतूक कोंडी होत आहे.

जी-20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांच्यां डांबरीकरणाचे काम जोरात सुरू आहे. डांबरीकरणाच्या कामामुळे विविध भाग वाहतुकीसाठी बंद ठेवले जात असून, वाहतूक वळविली जात असल्याने वाहतूक कोंडी होते. शहरातील अंतर्गत भागातून सुध्दा वाहतूक वळविली जात आहे. शहरातील अंतर्गत भागात अनेक ठिकाणी स्मार्ट सिटीअर्तंगत कामांसाठी रस्त्यावर खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे त्या रस्त्यांवरही सुध्दा वाहने अडकून पडत आहेत. शहरात हाती घेण्यात येणाऱ्या कामांबाबत नियोजनाचा अभाव दिसून येत आहे. संबंधितांकडून नागरिकांना होणाऱ्या त्रासाकडे डोळेझाक होत आहे. दरम्यान, चांगल्या कामासाठी नागरिकांना थोडे सहन केले पाहिजे, असा सल्ला नेत्यांकडून दिला जात आहे.