पणजीचा कौल

0
116

संपूर्ण गोव्याचे लक्ष ज्या पोटनिवडणुकीकडे लागले आहे, त्या पणजी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उद्या रविवारी मतदान होणार आहे. ही पोटनिवडणूक सरकारच्या स्थैर्यासाठी किती महत्त्वाची आहे हे स्वतः भाजपचे केंद्रीय नेेते नितीन गडकरी यांनीच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत जाहीर सभेत सांगितले असल्याने भाजपाच्या लेखी या निवडणुकीला किती महत्त्व आहे हे लक्षात येईल. स्व. मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर ही निवडणूक होते आहे, त्यामुळे तिला एक भावनिक किनारही आहे. पर्रीकरांची जागा त्यांच्या पुत्राला मिळावी यासाठी काही मंडळींनी जोरदार मोर्चेबांधणी करून पाहिली, परंतु शेवटी संघटनात्मक पूर्वानुभवाच्या मुद्द्यावर या मतदारसंघाचे दोन वेळा आमदारपद भूषविलेल्या सिद्धार्थ कुंकळेकर यांच्याच गळ्यात भाजपाची उमेदवारी पडली. तेव्हापासून पक्षामध्ये दुफळी नाही हे अधोरेखित करण्यासाठी स्व. पर्रीकर यांच्या दोन्ही पुत्रांनाही प्रचाराला जुंपून भाजपने पणजीमध्ये जोरदार प्रचार मोहीम राबवली. स्वतः मुख्यमंत्री डॉ. सावंत पणजीत तळ ठोकून बसले आणि त्यांनी सिद्धार्थ व अन्य नेत्यांच्या समवेत पणजी मतदारसंघ पिंजून काढला. त्यामुळे ह्या पोटनिवडणुकीतील जय पराजय भाजपसाठी अतिशय प्रतिष्ठेचा बनलेला आहे. दुसरीकडे, कॉंग्रेसने बाबूश मोन्सेर्रात यांच्यासारख्या स्वबळावरच पणजी जिंकण्याचा आत्मविश्वास असलेल्या आणि फार पूर्वीपासून त्या दिशेने मोर्चेबांधणी केलेल्या उमेदवाराच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली आहे. पक्षाचे काही ज्येष्ठ नेते बाबूश यांच्या प्रचारात जरूर उतरले, परंतु मुख्यत्वे ते स्वतःच्या कार्यकर्त्यांच्या बळावर ह्या निवडणुकीत उतरलेले आहेत आणि कॉंग्रेसने दिलेली उमेदवारी हे त्यांच्यासाठी केवळ निमित्तमात्र आहे. या पोटनिवडणुकीतील तिसरा लक्षवेधी चेहरा आहे तो सुभाष वेलिंगकर यांचा. पाच – दहा वर्षांपूर्वी जर कोणी भाकीत केले असते की वेलिंगकरांसारखी पन्नास वर्षे संघचालक राहिलेली व्यक्ती भाजपच्या अधिकृत उमेदवाराच्या पाडावासाठी अशी अटीतटीने रिंगणात उतरेल, तर त्याला कोणीही वेड्यातच काढले असते, परंतु पर्रीकर आणि वेलिंगकर यांच्यातील माध्यम प्रश्नाचे निमित्त होऊन निर्माण झालेली तेढ एवढ्या विकोपाला गेली की आज स्वतः वेलिंगकर शड्डू ठोकून भाजपच्या उमेदवाराच्या पाडावासाठी पुढे सरसावलेले आहेत. आपला प्रतिस्पर्धी बाबूश असल्याचे ते वारंवार सांगत आले आहेत, परंतु त्यांच्या उमेदवारीमुळे बाबूश यांची मते फुटणार की भाजपच्या उमेदवाराची मते फुटणार आणि जर तसे झाले तर त्याची परिणती काय होणार याबाबत बर्‍याच पणजीकर मतदारांच्या मनामध्ये चिंता आहे. वेलिंगकर यांच्या या उमेदवारीतून नेमके काय साध्य होणार आणि त्याचे गोव्याच्या राजकारणावर, राजकीय स्थैर्यावर नेमके काय परिणाम भविष्यात होणार याचे उत्तर देण्याची जबाबदारी अर्थातच निवडणुकीनंतर गोवा सुरक्षा मंचावर असेल. या निवडणुकीतील चौथा उमेदवार आहे तो म्हणजे आम आदमी पक्षाचा वाल्मिकी नायक. गेल्या वेळीही वाल्मिकी हिरीरीने निवडणुकीत उतरला होता. यावेळी पुन्हा एकदा त्याच्या माध्यमातून आम आदमी पक्ष गोव्यामध्ये आपले खाते खोलण्याचे स्वप्न रंगवत आहे. पोटनिवडणुकीचे एकूण चित्र हे असे आहे. कोण कोणावर मात करणार, कोण कोणाची मते फोडणार आणि या सगळ्या घुसळणीतून कोणाच्या गळ्यात विजयश्रीची माळ पडणार याबाबत तर्कवितर्क आणि राजकीय गणिते सध्या मांडली जात आहेत. पणजी मतदारसंघाचे एक वैशिष्ट्य म्हणजे येथे पुरुषांपेक्षा महिला मतदारांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे हजारांहून अधिक असलेल्या या महिला कोणत्या उमेदवाराला कौल देतात हे पाहणे औत्सुक्याचे असेल. युवा मतदारांचाही कौल या निवडणुकीत महत्त्वाचा आहे, कारण गोव्याच्या विकासाबरोबरच रोजगार हा एक महत्त्वाचा मुद्दा ह्या पोटनिवडणुकीत राहिला. सर्वांनी युवावर्गाला भरघोस आश्वासने दिलेली आहेत, परंतु तो कोणाच्या बाजूने झुकेल हे पाहावे लागणार आहे. पणजीचा मतदार हा सभ्य, सुसंस्कृत आणि विचारी मानला जातो. परंतु जात, धर्म, जवळीक आदी घटक येथेही आहेत. परंतु केवळ स्वतःपुरता किंवा स्वतःच्या फायद्याचा विचार करून नव्हे, तर गोव्याचा आणि गोव्याच्या हिताचा विचार करून पणजीवासीयांनी यावेळी मतदान करावे अशी अपेक्षा आहे. या निवडणुकीत केवळ व्यक्ती व्यक्तींचा संघर्ष नाही, तर विचारधारांचा आणि वृत्ती प्रवृत्तींचाही संघर्ष झडणार आहे. त्यामुळे तिला महत्त्व प्राप्त झालेले आहे. गोव्यातील ही सध्याची तरी शेवटची पोटनिवडणूक. या चारही पोटनिवडणुकांमधून गोव्याच्या राजकारणाला नवी दिशा मिळू शकते. लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात काय घडते त्यावरही गोव्याची राजकीय समीकरणे पालटू शकतात. त्यामुळे सरकारचे स्थैर्य जसे लोकसभेच्या निवडणुकीवर अवलंबून आहे, तसेच ते ह्या पोटनिवडणुकांच्या निकालांवरही अवलंबून आहे. त्यामुळे पणजीचा मतदार कोणाच्या बाजूने कौल देणार याबाबत उत्सुकता आहे. पणजीचा कौल हा निर्णायक ठरेल यात काही शंका नाही.