पडिक चिरेखाणी शोधण्याची मुख्यमंत्र्याची सूचना

0
97

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सरकारी अधिकार्‍यांना राज्यभरातील पडिक चिरे खाणी व इतर धोकादायक ठिकाणे हुडकून काढून तेथे दुर्घटना घडू नये म्हणून वेळीच उपाययोजना करण्याची सूचना काल केली आहे.
तुये पेडणे येथे एका चिर्‍याच्या खाणीत डॉन बॉस्को विद्यालयाच्या चार विद्यार्थ्यांच्या मृत्यूची घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सरकारी अधिकार्‍यांना वरील सूचना केली आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तुये पेडणे येथे चिरे खाणीत शालेय विद्यार्थी बुडालेल्या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. आपल्या आसपास असणार्‍या धोकादायक ठिकाणांची मुलांना माहिती देऊन धोका टाळण्यासाठी सावध करण्याची गरज आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी संदेशात म्हटले आहे.

राष्ट्रीय हरित लवादाने खाणी
बुजवण्याचा दिलेला आदेश
दरम्यान, राष्ट्रीय हरित लवादाने गेल्या एप्रिल २०१९ मध्ये तुये पेडणे भागातील धोकादायक चिर्‍याच्या खाणी सहा महिन्यांत बुजविण्याचा आदेश दिला होता. सरकारी यंत्रणेने या आदेशाची योग्य दखल घेतली असती तर चार विद्यार्थी बुडण्यची घटना टाळली असती, अशी प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. अनेक ठिकाणी चिर्‍यांच्या खाणी चिरे काढण्यात आल्यानंतर तशाच सोडण्यात आलेल्या आहेत. पावसाळ्यात या चिर्‍याच्या खाणींमध्ये पाणी साचून राहत त्या धोकादायक बनतात. त्यामुळे त्या बुजविण्याचा आदेश एनजीटीने दिला होता.