पं. प्रभाकर कारेकर ‘गोमंतविभूषण’ने सन्मानित

0
13

>> घटकराज्य दिनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण; विनायक खेडेकर यांनाही 2019-20 साठीचा पुरस्कार प्रदान

गोवा घटकराज्य दिनी आयोजित सोहळ्यात राष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायक पं. प्रभाकर कारेकर यांना 2021-22 सालासाठीच्या ‘गोमंतविभूषण’ या गोव्याच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यासोबतच लोकसंस्कृतीचे गाढे अभ्यासक पद्मश्री विनायक खेडेकर यांनाही 2019-20 सालासाठीचा गोमंतविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, 5 लाख रुपये, स्मृतिचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मंगळवारी दोनापावला येथील राजभवनच्या दरबार सभागृहात हा सोहळा पार पडला.

यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सन्माननीय पाहुणे म्हणून कला-संस्कृतीमंत्री गोविंद गावडे, जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर, वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, माजी मुख्यमंत्री तथा आमदार दिगंबर कामत, मत्स्योद्योगमंत्री नीळकंठ हळर्णकर, मुख्य सचिव पुनित कुमार गोयल, कला-संस्कृती खात्याचे सचिव मिनिनो डिसोझा, माहिती खात्याचे सचिव सुभाष चंद्रा हे उपस्थित होते.
विनायक खेडेकर आणि पं. प्रभाकर कारेकर यांनी देशाचा वारसा जपून देश-विदेशात नावलौकिक मिळविला. त्यांनी पुढच्या पिढीपर्यंत सांस्कृतिक वारसा पोहोचवला असून, आपल्या हस्ते त्यांना पुरस्कार देणे हे आपले भाग्य समजतो, असे उद्गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले.
गेल्या दहा वर्षांत गोव्याचा बराच विकास झाला आहे व त्यात मागच्या सरकारांचा व समस्त गोवेकारांचे योगदान आहे. उद्योग, पर्यटन, शिक्षण अशा बहुतेक क्षेत्रात विकास ठळकपणे दिसत आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

नव्या पिढीला संगीत, चित्रकला, नाट्यकला शिकण्याच्या आज अनेक सोयी आहेत. त्यामुळे त्यांनी या कला आत्मसात केल्या पाहिजेत. लोककलांचे दस्ताऐवजीकरण करण्याचे काम सुरू झाले आहे, असेही त्यांनी नमूद केले.
गोमंतविभूषण पुरस्कार दर दोन वर्षांनी गुणवत्ता आणि राष्ट्रीय स्तरावर योगदान लक्षात घेऊन असामान्य कर्तृत्वाबद्दल दिला जातो, असे गोविंद गावडे यांनी स्पष्ट केले. पद्मश्री खेडेकर व पं. कारेकर यांच्यापासून तरुण पिढीने प्रेरणा घ्यावी व भविष्यात गोव्याचे नाव मोठे करावे. या कलाकारांनी गोव्याला जागतिक सन्मान मिळवून दिला आहे. भारतीय संगीताचे सामर्थ्य तर आज जगाला माहित आहे. पं. कारेकर यांनी परिस्थितीवर मात करून, गुरुंची सेवा करून कष्टाने कला आत्मसात केली. तसेच खेडेकर यांनी लोकसंस्कृतीच्या संदर्भात ऐतिहासिक कार्य केले आहे, असेही गावडे म्हणाले.

गोवा हीच कर्मभूमी : खेडेकर
माझी तपोभूमी म्हार्दोळ, तर यज्ञभूमी कला अकादमी आणि कर्मभूमी संपूर्ण गोवा असे विनायक खेडेकर यांनी मनोगतात सांगितले. ग्रामीण भागातील असंख्य जणांनी माझ्या संशोधनात मला मदत केली, त्यांच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. लोककलांचा ध्यास होता तो श्वास कधी झाला हे कळलेच नाही. ‘बोनस’ म्हणून मिळालेले आयुष्य लोकसंस्कृतीसाठीच खर्च करायचे आहे. या क्षेत्रात बरेच काम झाले असले तरी अजून बरेच व्हायचे आहे. मूळ, पारंपरिक आणि विश्वासार्ह लोककला प्रकार आहेत, त्यांचे दस्ताऐवजीकरण व्हायला हवे. तसेच जे नष्ट होत चालले आहे, त्याला नवसंजीवनी द्यावी, अशा मागण्या खेडेकर यांनी राज्य सरकारपुढे ठेवल्या.
हर्षा सावंत यांनी गायिलेल्या स्तवनाने सोहळ्याला प्रारंभ झाला. मिनिनो डिसोझा यांनी स्वागत केले. सिद्धी उपाध्ये व प्रदीप नाईक यांनी सूत्रसंचालन केले.

मानपत्रांचे वाचन डॉ. अजय वैद्य व डॉ. पांडुरंग फळदेसाई यांनी केले, जे इंग्रजीत होते. सुभाष चंद्रा यांनी आभार मानले. पुरस्कार प्राप्त झालेल्या दोन्ही मान्यवरांची माहिती असलेल्या पुस्तिकेचे यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

… तो खरा गोवेकर : विनायक खेडेकर
‘जिथे इथल्या मातीपासून बनविलेले घुमट वाजते तो गोवा आणि त्याच्या नादाचा साज ज्यांना समजतो, तो खरा गोवेकर अशी विनायक खेडेकर यांनी घुमटाची व्याख्या करताच रसिकांनी टाळ्यांनी दाद दिली.

संगीताशी कधीच प्रतारणा केली नाही : पं. कारेकर
माझ्या जन्मभूमीत मला हा गोव्याचा सर्वोच्च पुरस्कार मिळाला याचा मोठा आनंद आहे. त्याचे श्रेय माझ्या गुरुजनांचाही जाते. काय गायचं, कसं गायचं हा मार्ग त्यांनी दाखवला आणि मी प्रामाणिकपणे संगीत जगलो. संगीताशी कधीच प्रतारणा केली नाही, असे पं. प्रभाकर कारेकर यांनी मनोगतात सांगितले.

पुरस्कार वितरण सोहळ्याची क्षणचित्रे
मंत्रालयाचे उद्घाटन करून येईपर्यंत मुख्यमंत्र्यांना बराच उशीर झाल्याने पुरस्कार वितरण सोहळा दीड तास उशिरा सुरू झाला.
लोककला पथकाच्या मिरवणुकीने विनायक खेडेकर व पं. प्रभाकर कारेकर यांना ‘अँटिक कार’ मधून दरबार सभागृहाच्या प्रवेशद्वारावर आणण्यात आले. त्यानंतर त्यांच्या डोक्यावर अब्दागीर धरून त्यांना आसनस्थ केले.


मुख्यमंत्री व पाहुण्यांनाही मिरवणुकीने सभागृहापर्यंत आणण्यात आले.
मुख्यमंत्र्यांनी दोन्ही पुरस्कार प्राप्त मान्यवरांच्या कर्तृत्वाचा आलेख दर्शवणाऱ्या छायाचित्र प्रदर्शनाचे पुरस्कार वितरणाआधी उद्घाटन केले.
व्यासपीठावर 9 खुर्च्या ठेवण्यात आल्या होत्या; परंतु आयत्यावेळी काही मंत्र्यांचे आगमन होणार असे कळल्यावर अजून 3 खुर्च्या वाढवण्यात आल्या. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव मात्र व्यासपीठावर उपस्थित नव्हते.